कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पंधरा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून विस्तार अधिकारी पदावर नियुक्त होऊन तब्बल वीस वर्षे प्रशासनात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आर. व्ही. कांबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार व निरोप समारंभ रविवारी दि. ७ जून २०२६ मोठ्या भावनिक वातावरणात संपन्न झाला.
साईक्स एक्स्टेन्शन, कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षण, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. आर. व्ही. कांबळे यांनी शिक्षक आणि अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, महानगरपालिका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, खाजगी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, इंग्लिश मिडीयम स्कूल संघटना, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विविध माजी पदाधिकारी, माजी सरपंच, माजी उपसरपंच, बस्तवडे (ता. कागल) ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, दूध संस्था, पतसंस्था, शिक्षक बँक, विविध शिक्षक पतसंस्था, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच बस्तवडे गावातील समस्त ग्रामस्थ आणि कांबळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
श्री .आर. व्ही. कांबळे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षक म्हणून मिळालेला अनुभव आणि प्रशासनात काम करताना मिळालेले सहकार्य यामुळेच आपण यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सेवाकाळात सहकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आर. व्ही. कांबळे यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार जयंत असगावकर , के .डी .सी .सी . बँकेचे संचालक भैय्या माने ,शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव , प्रवीण यादव यांचेसह सर्व संघटनांचे पदाधिकारी व शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते.
भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या समारंभाने आर. व्ही. कांबळे यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवाकार्यास मानवंदना दिली. शिक्षक ते विस्तार अधिकारी असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्शवत ठरणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
--------------------------







