शिवाजी विद्यापीठातील मानवतावादी विचारांचे नवे व्यासपीठ : शरण साहित्य अध्यासन केंद्र : लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

Kolhapur news
By -

 

                




               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         शिवाजी विद्यापीठ, शरण साहित्य अध्यासन केंद्राचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तसेच मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि  माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत होते.


शरण साहित्याची समतावादी, मानवतावादी आणि परिवर्तनवादी परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. 


यावेळी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. ए.एन. जाधव, सिनेट मेंबर अभिषेक मिठारी, उपविभागीय अभियंता हेमा जोशी, श्रद्धा देसाई, अध्यासन सल्लागार सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके, विलास आंबोळे यांच्यासह यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.


    शिवाजी विद्यापीठा मध्ये सुरू झालेले शरण साहित्य अध्यासन केंद्र हे १२व्या शतकातील शरण संतांच्या (बसवेश्वर, अक्कमहादेवी, अल्लमप्रभू, चन्नबसवण्णा आदी) मानवतावादी, समतावादी आणि विवेकवादी विचारांचा अभ्यास, संशोधन व प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला असून त्याची मागील काही वर्षांपासून तयारी सुरू होती. 


              केंद्राची प्रमुख उद्दिष्टे


शरण साहित्य, वचन परंपरा आणि लिंगायत चळवळीचा अभ्यास.

सामाजिक समता, बंधुता, स्त्री-पुरुष समानता आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचा प्रसार.

संशोधन प्रकल्प, परिसंवाद, व्याख्यानमाला आणि प्रकाशने आयोजित करणे.

विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना शरण साहित्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सांस्कृतिक व वैचारिक सेतू अधिक मजबूत करणे. 


     "मानवतावादी विचारांचे नवे व्यासपीठ"


या केंद्राच्या उद्घाटनावेळी शरण साहित्याचा मूलभूत संदेश म्हणजे मानवतेला धर्मापेक्षा श्रेष्ठ मानणे, जातिभेदाला विरोध करणे आणि समताधिष्ठित समाज घडवणे हा असल्याचे उपस्थित मान्यवरांच्या कडून अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे हे केंद्र केवळ साहित्य अभ्यासापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे व्यासपीठ म्हणून कार्य करेल, अशी अपेक्षा ही  यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. 


        ----------------------------