मुरगूड पोलिसांचे नागरिकांकडून अभिनंदन. गांजा मुक्त शहर व्हावे हीच अपेक्षा.

Kolhapur news
By -

 

                     


                   कोल्हापूर न्यूज / वि. रा .भाेसले


       मुरगूड पोलिसांनी नुकतीच गांजा तस्करी उघडकीस आणली. कांही तस्करांना गजाआड डांबले. मुरगूड पोलीस ठाण्याच्या या कारवाईचे नागरिकांकडून मोठया प्रमाणात स्वागत होत आहे.


 सहाय्यक पोलीस निरिक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहसी आणि अत्यावशक पाऊल उचलण्यात आले आहे.विशेष म्हणजे हेड कॉन्स्टेबल बजरंग पाटील यांनीच ही फिर्याद दाखल केली आहे.


    या कारवाईचे कौतुक मुरगूडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी सुद्धा केले आहे. स्वच्छ मुरगूड ही संकल्पना फक्त रस्ते, बागा, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, दवाखाने यांच्यापुरतीच मर्यादित न रहाता मानवी आरोग्याशी सुद्धा निगडित असली पाहिजे असे मत कांही नगरसेवक, डॉक्टर व व्यापारी बंधूनी व्यक्त केले आहे.विशेषतः युवकांच्या मध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता हा फार मोठा चिंतेचा विषय बनला आहे.


    तीन वर्षांपूर्वी येथील कांही शिवभक्तांनी गावतलावाजवळील ऑक्सिजन पार्क मध्ये गांजाविक्रेत्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.खरं तर त्याच वेळी या मोहिमेची सुरुवात व्हायला हवी होती.कांही प्रतिष्ठितांच्या हस्तक्षेपा मुळे त्यावेळी ती कारवाई पुढे रेटली गेली नाही.सगळीकडे हे असेच सुरु आहे. पिडितेवर अत्याचार करणारे राधानगरीचे गुन्हेगार पोलिसांच्या पहाऱ्यात असूनही मुजोरी दाखवतात अशा बातम्या माध्यमानी प्रसारित केल्या. त्यांच्या मागे कोण कोण बाहुबली आहेत हे सुद्धा प्रकाशात यायला हवे. कारण घटना मुरगूड परिसरातील असून शहाराची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे.


    नगरपरिषदे समोर छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ आहेत. यापूर्वी त्यांचा अर्धा पुतळा होता.मुरगूडचे एक शिवभक्त धोंडीराम परीट त्या अर्ध्या पुतळ्याची नित्य पूजा करायचे. ती प्रेरणा घेऊन अनेक शिवभक्त पुढे आले. छत्रपतींचा आश्वारूढ पुतळा उभा राहिला. भोवताली शिवतीर्थ तयार झाले.आज त्याला एका मंदिराचे स्वरूप आले आहे. पायाच्या वहाणा बाहेर ठेवून शिवतीर्थावर प्रवेश होतो.नगर परिषदेचे प्रत्येक महत्त्वाचे काम सुद्धा शिवरायांना वंदन करून सुरू होते.युवकांच्यातील व्यसन मुक्ती हे सुद्धा एक विधायक आणि अत्यंत महत्वाचे काम आहे.


   मुरगूड पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यांचे केवळ कौतुक करून थांबायचे नाही. त्यांना सर्व स्तरावर सहकार्य करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.मुरगूडचा पत्रकार संघ सुद्धा या कामी पोलिसांना सहकार्य करत असतो.मे च्या सुट्टी मध्ये पत्रकारांनी रोड रोमिंयो च्या कांही घटना सपोनी क्रांती पाटील यांच्या निदर्शनास आणल्या तेंव्हा त्यांनी आश्वासन दिले आहे. शाळा सुरु झाल्या की आपण या मोहिमेची सुरुवात करूया.असे कर्तव्यदक्ष अधिकारी मुरगूडला मिळणे हा एक चांगला  योग आहे.


   येथील शिवभक्त समाज सेवक तर सदैव अशा कामात तत्पर असतात.31 डिसेंबर च्या मद्य पार्टी वर सुद्धा या शिवभक्तांनी जोरदार आक्षेप घेतला. ही तर ब्रिटिशांची परंपरा असून गुलामी वृत्ती ची निर्देशक आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले.कांही पोरांनी ते ऐकले सुद्धा.शिवजयंती मिरवणुकीत हवे तेवढे ढोल वाजवा, लेझीम खेळा पण अमली पदार्थ सेवन करून झिंगू नका असा  सभ्य संदेश सुद्धा तमाम शिवभक्तांनी तरुणाईला दिला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मुरगूड पोलिसांचे नागरिकांनी केलेले अभिनंदन प्रेरणादायकच आहे.

 शहर गांजा मुक्त झाले पाहिजे.




    --------------------------------------