मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि हीच राज्यातील १४ कोटी जनतेची भावना आहे. त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रात अर्थमंत्री होणार, अशा राजकीय चर्चा अधूनमधून सातत्याने रंगत असतात. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी केलेले हे विधान राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची जोरदार पाठराखण केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारे दूरदृष्टी असलेले अष्टपैलू नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्यकाळात राज्याने अनेक महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प आणि लोकहिताचे गतिमान निर्णय पाहिले आहेत.
---------------------

