मुंबई : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय महान व्यक्ती व संतांच्या' अधिकृत यादीत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानने दिली आहे. महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे. किरण साठे यांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्र्यांना पत्र पाठवून महाराष्ट्राचे वैभव असलेल्या लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि सामाजिक कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा, यासाठी त्यांचे नाव केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय महान व्यक्ती' यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली होती.
आंबेडकर प्रतिष्ठानचे संचालक विनेश पचनंदा यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पत्र (ईओ क्र. ५३९२२) पाठवून केंद्र सरकारच्या निर्णयाची माहिती किरण साठे यांना दिली आहे. केंद्र सरकारच्या 'महान संतांच्या जन्म/मृत्यू वार्षिक उत्सवाच्या आयोजनासाठी डॉ. आंबेडकर योजना' अंतर्गत देशातील महान संत व राष्ट्रपुरुषांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत भगवान बुद्ध, संत कबीर, गुरू रविदा महा पा ज्योतिबा फुले, संत नामदेव, चाेखामेळा, महर्षी वाल्मिकी नारायण गरू महापुरुषांचा समावेश आहे. या यादीत 'तुकाराम भाऊराव साठे' अर्थात लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि साहित्याचा राष्ट्रीय पातळीवर प्रसार होण्यास मोठी मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पात्र सामाजिक संस्था, महाविद्यालये व विद्यापीठांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आर्थिक अनुदान मिळू शकणार आहे. इच्छुक संस्थांना यासाठी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्रासह आंबेडकरी चळवळीतून स्वागत होत असून, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
---------------------------

