परवानगी शिवाय दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरला १ लाख ४ हजाराचा , तर दुसऱ्याला ९० हजाराचा दंड : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Kolhapur news
By -

 

             


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल्सनी परवानाची मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण केले नाही. दर तीन वर्षांनी परवाना नूतनीकरण अत्यावश्यक असताना त्याकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अशा हॉस्पिटल्सची तपासणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना, तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालये व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या हॉस्पिटल्स तपासणीसाठी  नियुक्त केले आहे. स्थानिक पर्यवेक्षकीय प्राधिकारी नेमले असतानाही अनेक हॉस्पिटल्सनी त्यांना चकवा देत विना परवाना हॉस्पिटल्स चालवित आहेत. राधानगरी तालुक्यातील परित येथील डॉ. अनिल वसंतराव कातिवले यांच्या नर्सिंग होमचे परवाना नूतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या हॉस्पिटलमधील बेडची संख्या दहा आहे. मात्र त्यांनी, ३१ मार्च २०२० नंतर हॉस्पिटल चालविण्याचा परवाना नूतनीकरण केलेच नाही. मात्र त्यांनी आंतररुग्ण सेवा चालू ठेवली.


जिल्हा आरोग्य विभागाने त्यांना नोटीस काढून एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र त्यांनी खुलासा वेळेत व समाधानकारक केला नाही. आरोग्य विभागाने हॉस्पिटल सील केले आहे. त्यांची नोंदणी रद्द केली आहे. तसेच एक लाख चार हजार रुपयांचा दंड केला आहे. गगनबावडा येथील निवडे येथील डॉ. अमोल जाधव यांनीही त्यांच्या हॉस्पिटलच्या परवानाचे २०२० पासून नूतनीकरण केले नाही. यामुळे आरोग्य विभागाने त्यांच्यावर जवळपास ९० हजार रुपये दंड केला आहे. या दोन केसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे.


महाराष्ट्र नर्सिंग अक्ट अंतर्गत परवाना नूतनीकरण बंधनकारक आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंबंधी खासगी हॉस्पिटल्स तपासणीच्या सक्त सूचना देण्यात येत आहेत. ज्या हॉस्पिटल्सनी परवाना नूतनीकरण केले नाही , त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे  यांनी सांगितले. 


                    ---------------------------