कोल्हापूरला दोन कॅबिनेट मंत्री लाभले. शहराचे आणि जिल्ह्याचेही भाग्य उजळले.

Kolhapur news
By -

 

            


               कोल्हापूर न्यूज / वि. रा. भोसले



  ना. हसन मुश्रीफ आणि ना. प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने कोल्हापूरला दोन कॅबिनेट मंत्री लाभले. आणि शहरासह जिल्ह्याचे सुद्धा भाग्य उजळले. ही अतिशयोक्ती नाही. थोडे मागे जाऊ म्हणजे लक्षात येईल.



        कोल्हापूरला कलापूर  म्हणतात. कुस्तीची पंढरी म्हणतात, दक्षिण काशी म्हणतात. छत्रपतींची दुसरी गादी म्हणतात. पुरोगामी विचारांची गंगोत्री म्हणतात. काय काय म्हणून अनेकांनी अनेक वर्षे या शहराची आरती केली होती. आजही करतात. 50 वर्षे मागे जाऊ.


  वसंतदादा मुख्य मंत्री होते. सांगलीला जिल्हा परिषदेची शानदार इमारत झाली. कोल्हापूरची जि. प. मात्र जुन्या वाड्यातच कित्येक वर्षे राहिली. त्याचवेळी सांगली आणि सातारा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या भव्य इमारती उभ्या राहिल्या होत्या. के डी सी सी बँक मात्र कित्येक वर्षे बिंदू चौकातील दोन मजली इमारतीत कित्येक वर्षे घुसमटत होती. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यावेळचे औरंगाबाद कोल्हापूर पेक्षा मोठे झाले.तिथली भव्य एम आय डी सी बघुन कोल्हापूरचे उद्यम नगर लाजले.त्यावेळी कोल्हापूरकर "बेळगांव, धारवाड, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे." म्हणून  कंठरवाने  घोषणा देत होते.पदरी कांहीच नाही. बेळगाव कारवार शहरे मात्र कोल्हापुर पेक्षा सुधारली.मोठी झाली.



   माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही कोल्हापूरनेच  बळ दिले. रिक्षातून फिरून त्यांनी कोल्हापूरकरांशी नाते जोडले.मुख्यमंत्री असतांना त्यांनीही कोल्हापूर कडे फारसं लक्ष दिलंच नाही. सुशीलकुमार शिंदेनी तर सोलापूर कुठल्या कुठे नेले.कोल्हापूरकर मात्र नुसती दुसऱ्याची हलगी वाजवत राहिले. कोल्हापूरला कॅबिनेट मंत्री पद नव्हतेच. रत्नापा कुंभार आणि श्रीपतरावं बोन्द्रे,हे त्या काळातील राज्यमंत्री. त्यानंतर उशीरा सदाशिवराव मंडलिक व दिग्विजय खानविलकर यांना कॅबिनेट मिळाली. मंडलिकांच्या काळात काळम्मावाडी धरण आणि खानविलकरांनी मेडिकल कॉलेज आणले.कोल्हापूरने आता कुठं आरशात पाहून मिशीवर पीळ द्यायला सुरुवात केली होती. एक छोटं उदाहरण दिले की लक्षात येईल.


      सशस्त्र क्रांतिकारक सुभाष चंद्रबोस यांना स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी न्याय मिळाला. कोल्हापूरला क्रांतिकारक शहर म्हणतात. क्रांती फक्त चप्पल आणि कुस्तीत होऊन चालणार नव्हती. शाहू, फुले आंबेडकर म्हणत  शरद पवार कोल्हापूरला नुसते कुरवाळत राहिले. कोल्हापूरकरांनी त्यांना वस्ताद म्हंटले. वस्ताद मात्र बारामती सोडून कोल्हापूरच्या आखाड्यात कधी उतरलेच नाहीत. असुदे हा काळा सावळा भूतकाळ होता.



  आता कोल्हापूरला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. दोघेही विकास पुरुष आहेत.त्यांची रहाणी सुद्धा साधी. रंगीबेरंगी जॅकेटस कधी त्यांनी चढवले नाहीत. सफारी आणि कोट तर दूरच. कोल्हापुरी फेटा मात्र त्यांनी  नुसता मिरवला नाही तर त्याचा झेंडा करून त्यांनी तो राज्यभर फडकवला. समजलं नाही? सर्किट बेंच आणि खंडपीठ यांचा पाठपुरावा करणे एवढंच त्यांच्या हाती होतं. माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्किट बेंच आणलं . एक वर्षे पूर्ण झाले. खंडपीठ पण येणार. पण त्यासाठी जमीन कुठून आणणार ?  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 75 एकराचा 7/12 उताराच न्यायमूर्तींच्याकडे सादर केला. आणखी काय पाहिजे.!



    आय टी पार्क म्हंटलं की पोरं पोरी पुण्याला हिंजवडीला किंवा बेंगलोरला पळायची. आता कोल्हापुरातच  आय टी पार्क होणार अशी घोषणा ना.मुश्रीफ यांनी केली आहे. ते तर तीस वर्षे मंत्री आहेत. शेंडा पार्क येथे विशाल हॉस्पिटल पण होणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने अगदी  गावा गावात ग्रामीण रुग्णांलये होत आहेत. उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा सव्वाशे रुग्णालयांचे  ऑनलाईन उद्घाटनही केले.अत्याधुनिक वैद्यकीय मशिन्स खेड्यात सुद्धा येत आहेत. सगळं मोफत. सूंदर पर्यटन स्थळे आकार घेत आहेत. राज्य मार्ग सिमेंटचे होत आहेत. कागल सारख्या शहारात संगीत रंगीत कारंजे सुद्धा पहायला मिळत आहेत. कशाला जाताय गोव्याला? दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी कोल्हापूरला विकास गंगा आणली आहे. सत्तेत आहेत तोपर्यंत ते हयगय करणार नाहीत. कोल्हापूरचा महापूर सुद्धा या दोघांना  भिऊन पळाला. जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहिल्या पण गरिबांच्या झोपडीत नाही शिरल्या.


   

 मुख्यमंत्र्यांना घेऊन आलमट्टीला सुद्धा त्यांनी शह दिला आणि नेटके पूर नियोजन केले.फक्त हा विकास शुद्ध अवस्थेत  सामान्यांच्या पर्यँत पोचवणारे 'तुकाराम मुंडे' कोल्हापूरला हवे आहेत.


        ------------------------