शाळास्तरावर माहिती "अधिकार कायद्याचा" प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील ७७५ मुख्याध्यापकांना प्रशिक्षण

Kolhapur news
By -

                

      

    

 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    यशदा पुणे व शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अनुदानित माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आयोजित विशेष दोन दिवसाचे प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात राम गणेश गडकरी सभागृह कोल्हापूर येथे  पार पडले. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ७७५ मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. 


       शाळा स्तरावर माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, माहिती अर्जांची योग्य पद्धतीने हाताळणी व्हावी तसेच अर्जदारांना कायद्यानुसार विहित मुदतीत अचूक व पारदर्शक माहिती उपलब्ध करून देता यावी, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.


     कार्यक्रमाच्या प्रारंभी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रशिक्षण कार्यक्रमाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट करतांना आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी माध्यमिक शाळांच्या प्रशासनामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन यांचे महत्त्व अधोरेखित केले. माहितीचा अधिकार अधिनियम हा नागरिकांना शासन व सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदा असून, शाळा स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापकांना कायद्याच्या तरतुदींची योग्य माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्ञ

       यानंतर यशदाचे संशोधन अधिकारी दादू बुळे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील विविध तरतुदी, माहिती अधिकार अर्जाची प्रक्रिया, अर्ज प्राप्त झाल्यानंतर करावयाची कार्यवाही, माहिती उपलब्ध करून देण्याच्या विहित मुदती तसेच संबंधित अभिलेखांचे जतन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 


      तज्ञ प्रशिक्षक रेखा साळुंखे यांनी प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारच्या माहिती अधिकार अर्जांचा संदर्भ देत प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शाळांकडे प्राप्त होणाऱ्या विविध माहिती अर्जांमध्ये कोणती माहिती द्यावी, कोणती माहिती कायद्यानुसार अपवादात्मक स्वरूपाची असू शकते, अर्जाची पूर्तता करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच माहिती देताना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक व कायदेशीर बाबी यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.


    प्रशिक्षणादरम्यान विविध माहिती अधिकार अर्जांबाबत प्रश्नोत्तर व चर्चासत्र घेण्यात आले. मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर प्रत्यक्ष येणाऱ्या विविध अडचणी, अर्जांची हाताळणी, अभिलेखांची उपलब्धता, माहिती संकलन आणि विहित कालावधीत माहिती देताना येणाऱ्या अडचणी याबाबत प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी या प्रश्नांना कायदेशीर तरतुदींच्या आधारे समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले. अंमलबजावणी करताना पारदर्शकता, अचूकता, वेळेचे पालन आणि कायदेशीर प्रक्रिया या बाबींना विशेष महत्त्व असल्याचे प्रशिक्षणातून स्पष्ट करण्यात आले. शाळा प्रशासनातील विविध नोंदी व अभिलेख व्यवस्थित ठेवणे, माहिती अधिकार अर्जांची नोंद करणे आणि संबंधित अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करणे याबाबतही मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले.


या प्रशिक्षणामुळे अनुदानित माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ची व्याप्ती, प्रक्रिया व कायदेशीर बाबी यांचे अधिक सखोल ज्ञान मिळाले. परिणामी भविष्यात शाळा स्तरावर प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांची योग्य, पारदर्शक आणि विहित मुदतीत पूर्तता करण्यास निश्चितच मदत होणार आहे.

     यशदा, पुणे आणि शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि कायदेशीर चौकटीत प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळणार आहे.


    मुख्याध्यापकांसाठी विशेष प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करतांना यशदाचे संशोधन अधिकारी दादू बुळे


          


  

 
             ------------------------