कॅमेऱ्याच्या नजरेतून समाज : कन्या महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

Kolhapur news
By -

 


            


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क 



श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथील समाजशास्त्र विषयाच्या वतीने “कॅमेऱ्याच्या नजरेतून समाज” या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी विद्यार्थ्यांना मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


       सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आणि फोटोच्या विळख्यात अडकत चालली असताना कन्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मात्र याचा वापर करून समाजातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना समाजातील विविध घटक, सामाजिक समस्या, सांस्कृतिक परंपरा, ग्रामीण व शहरी जीवन, तसेच सामाजिक बदल यांचे छायाचित्रण करून त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेण्याची संधी मिळणार आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून समाजाचे निरीक्षण, विश्लेषण आणि आकलन करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.



        कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.संगीता पाटील मॅडम यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी प्र. प्राचार्य डॉ. श्रुती जोशी  यांनी विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले तर सदर कार्यक्रमाचे आयोजन समाजशास्त्र विषयाचे डॉ. संतोष कोळी आणि प्रा. किरण कानडे यांनी केले.



       महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि समाजशास्त्र विषयात रुची असणाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


              -----------------------