कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील भौतिक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, संचालक यांच्यापासून ते विविध विभागीय मंडळांचे अध्यक्ष व उपसंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जिल्ह्यात शाळा भेटींचा धडाका सुरू केला आहे.
आकांक्षित गगनबावडा तालुक्यात अनपेक्षित पाहणी
राज्याच्या संतुलित व सर्वांगीण विकासासाठी निवडलेल्या आकांक्षित तालुक्यांना प्राधान्याने भेटी देण्याच्या शासनाच्या निर्देशांनुसार, राजेश क्षीरसागर यांनी गगनबावडा तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंधे आणि अणदूर या दोन शाळांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.या प्रत्येक शाळेत तीन तासांच्या भेटीदरम्यान त्यांनी प्रमुख बाबींची सखोल तपासणी केली:
पायाभूत सुविधा: वर्गांची भौतिक स्थिती, छताची दुरुस्ती, वीज जोडणी, बेंच व फर्निचरची उपलब्धता.
स्वच्छता व आरोग्य: मुले व मुलींसाठी स्वतंत्र कार्यन्वित स्वच्छतागृहांची सुविधा, पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि टाकीची स्वच्छता.
पीएम पोषण आहार (MDM): विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा, किचन शेडची स्वच्छता, अन्नधान्य साठवणूक आणि दैनंदिन ऑनलाईन उपस्थिती नोंदणी.
शैक्षणिक गुणवत्ता व निपुण भारत:
विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, मूलभूत गणितीय संख्याज्ञान कौशल्य (FLN), निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी आणि डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची सद्यस्थिती.
शाळा भेटींनंतर त्यांनी गगनबावडा पंचायत समितीला भेट देऊन तेथील शिक्षण विभागाच्या प्रशासकीय व सक्षमीकरण शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
शहरातील न्यू राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची पाहणी:
ग्रामीण आणि आकांक्षित भागासोबतच शहरी भागातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा तपासण्यासाठी त्यांनी कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक व प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या न्यू राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला भेट दिली. तेथे त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील वर्ग अध्यापन, प्रयोगशाळा (ICT व ATL लॅब), ग्रंथालय, सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सखी सावित्री समिती’, सीसीटीव्ही कॅमेरे व Child Helpline क्रमांकांची दर्शनी भागातील उपलब्धता या बाबींची बारकाईने तपासणी केली.
अधिकारी व शिक्षण कर्मचाऱ्यांची तातडीची आढावा बैठक:
शाळा भेटींच्या सत्रानंतर नोडल अधिकारी राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा स्तरावर तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, प्राथमिक शिक्षण अधिकारी अशोक घुगे, माध्यमिक व योजना विभागाचे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय साधन व्यक्ती आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दात बजावले की,अचानक भेटींचा इशारा:अभियानाच्या कालावधीत (२० ऑक्टोबरपर्यंत) जिल्ह्यातील कोणत्याही माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळेला कधीही पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली जाईल.
त्रुटींची तातडीने पूर्तता: शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी किंवा क्रीडांगण कुंपण भिंत यात त्रुटी आढळल्यास त्वरित प्रशासकीय सुधारणा कराव्यात.
शिक्षणाचा दर्जा व यु-डायस प्लस नोंदणी: UDISE+ डेटा, PGI इंडेक्स, PAT चाचण्या, शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सक्षमीकरण आणि माजी विद्यार्थी संघांच्या स्थापनेबाबत वेळेत उद्दिष्टे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पालकमंत्री, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा:
भेटींच्या अंती नोडल अधिकारी राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन यांची सविस्तर भेट घेतली.बैठकीत शाळा भेटीदरम्यान आढळलेल्या बाबी, जिल्ह्यातील शाळांमधील भौतिक सुविधांची गरज, शाळा दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता, विद्यार्थ्यांचे आरोग्य व कुपोषण मुक्ती आणि सामाजिक दायित्व निधी (सीएसआर / लोकसहभाग) मिळवून शाळांचे सक्षमीकरण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
या मोहिमेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील प्रशासकीय आणि शैक्षणिक यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून शाळांच्या गुणवत्तेत व सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------------------


