कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीच्या संदर्भात रणजीतसिंह पाटील आणि प्रवीणसिंह पाटील या पाटील बंधूंची भेट घेतली.या दोघांमध्ये पाच वर्षापासून अबोला आहे.दोघे विभक्त राहतात त्यामुळे पाटील घराण्याची एकंदर ताकत कमी झाली आहे की काय असा समज निर्माण झाला आहे. गोकुळ सह अन्य अनेक निवडणुकीत या दोघा भावांच्या राजकीय प्रभावाचा फार मोठा वाटा राहिला आहे.
रणजितसिंह पाटील हे दोन वेळा गोकुळ संघाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी प्रविणसिंह पाटील यांनी त्यांना भरघोस पाठिंबा दिला होता. हे दोघे भाऊ एकत्र यावेत म्हणून साधारण वर्षभरापूर्वी कोल्हापूर न्यूज नेटवर्क ने एक वार्तापत्र प्रसिद्ध केले होते.ते दोघे एकत्र यावेत अशी अपेक्षाही त्यातून व्यक्त केली होती. पण अद्यापही ते मनाने एकत्र आले नाहीत आमदार सतेज पाटील हे गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुरगूडला आले होते. त्यांनी राजकीय हेतू किंवा पक्ष बाजूला ठेवून गोकुळ बचाव साठी मतदान करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यांचे हे आवाहन अत्यंत नम्र भाषेत आणि मनाला जाऊन भिडणारे होते. याचे कारण त्यांनी सर्व दूध उत्पादकांच्या प्रश्नालाच हात घातला होता. दूध उत्पादकांना एक रुपया मागे 90 पैसे मिळावेत आणि गोकुळ मध्ये इतर कोणाचा व्यक्तिगत प्रभाव असू नये असे मत त्यांनी मांडले. गोकुळ हे संचालकांचे नव्हे तर उत्पादकांचे आहे हे लक्षात घ्यावे हा मुद्दा बऱ्याचशा दूध उत्पादकांनाही आणि ठराव धारकांनाही पटला आहे.
रणजीतसिंह पाटील यांचे चिरंजीव विश्वजीतसिंह पाटील यांना गोकुळची उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे.
एकंदरीत मूरगूडकर पाटील घराण्याकडे गोकुळचे प्रतिनिधित्व असले पाहिजे असा सूर येथील जनमानसातून उमटू लागला आहे. त्यात गैर असे कांही नाही.
पाटील घराणे हे प्रथम शेतकरी घराणे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या समस्यांची जाण आहे. देशातील पहिला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा स्व. विश्वनाथराव पाटील यांनी सुरू केला आहे. त्यानंतर असे शेकडो बंधारे अनेक नद्यावर झाले.
परिसरातील वारकरी पंथाचा आधारवड म्हणून या घराण्याकडे पाहिले जाते. पंढरीला जाणारे परिसरातील वारकरी जथे या सावली तून पुढे जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची परंपरा गेली 105 वर्षे सुरू आहे. भारतीय संस्कृतीच्या पारंब्यावर झोके घ्यायला याच घराण्याने लोकांना शिकवले आहे.लोकहितार्थ काम करतांना मतलबी राजकारणाची पादत्राणे नेहमीच बाजुला काढून ठेवली आहेत.
इथला पाटील / मंडलिक संघर्ष आता फार जुना झाला आहे.त्याच्या झळा दोन्ही गटांना बसल्या होत्या. असे असूनही फोडा फोडीचे मतलबी राजकारण या गटांनी कधी केले नाही. उलट इतरांनी त्यांचा वेळोवेळी उपयोग करून घेतला.
या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी मांडलेली भूमिका प्रामाणिक वाटते. गोकुळची निवडणुक ही फक्त निमित्त ठरली आहे एवढेच.सतेज पाटील यांनी या दौऱ्यात मुरगूड मध्ये वीरेंद्रसिंह मंडलिक, रणजितसिंह पाटील,प्रवीणसिंह पाटील विश्वजितसिंह पाटील, दिग्विजयसिंह पाटील,सत्यजितसिंह पाटील या सर्वांशी विचारविनिमय केला. पेरणी तर झाली आहे.उगवणी आणि अंकुर फुटव्याची वाट पहाणे सुरू आहे.
-----------------------------


