मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासाची सवय लावूया ! : आदर्श मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम : अभ्यास प्रेरणा फलकाचे उद्घाटन

Kolhapur news
By -

 



         

          


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क



मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लहान वयातच अभ्यास, वाचन, शिस्त आणि वेळेचे नियोजन यांसारख्या चांगल्या सवयी रुजाव्यात, या उदात्त हेतूने आदर्श मित्र मंडळाच्या वतीने 'मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासाची सवय लावूया!' हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मुलांना दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत अभ्यासासाठी प्रोत्साहित करणाऱ्या मार्गदर्शक फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.



आजच्या मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापराच्या काळात मुलांनी दररोज किमान एक तास अभ्यास, वाचन आणि सर्जनशील उपक्रमांसाठी द्यावा, तसेच पालकांनीही या वेळेत मुलांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पालकांनी मुलांसोबत बसून अभ्यास करणे, गोष्टी सांगणे, वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



याच कार्यक्रमात गावच्या कन्या डॉ. धनश्री अजित पोवार यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करून डॉक्टर होण्याचा मान मिळविल्याबद्दल त्यांचा आदर्श मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशामुळे गावातील विद्यार्थी आणि लहान मुलांसमोर शिक्षणातून मोठे ध्येय साध्य करण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.



यावेळी उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक विष्णू तुकान, माजी ग्रामविकास अधिकारी, राजेंद्र नुल्ले, प्राचार्य सागर खोंद्रे, प्राध्यापक संदीप जोशी, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच आदर्श परिवारातील सहकुटुंब पालक उपस्थित होते. ग्रामस्थ, महिला, युवक आणि बालचमूंचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



'आजची सवय, उद्याचे यश' या प्रेरणादायी विचारातून सुरू झालेला आदर्श मित्र मंडळाचा हा उपक्रम केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून मुलांमध्ये चांगल्या जीवनमूल्यांची रुजवण करणारा आहे. योग्य वयात योग्य सवयी लागल्यास मुलांचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांना साथ देणे ही काळाची गरज आहे.



                      ------------------