कोल्हापुरातील संघर्ष मोर्चा मध्ये 'गोकुळ' मधील शासकीय हस्तक्षेपाला दूध उत्पादकांचा प्रचंड विरोध

Kolhapur news
By -

           

    
       




            कोल्हापूर न्यूज / वि. रा. भाेसले



'गोकुळ' च्या अध्यक्ष पदाची निवडणूक निवडून आलेल्या 25 संचालकातूनच व्हावी.शासन नियुक्त संचालकांना मतांचा अधिकार असू नये या मागणीसाठी कोल्हापूर मधील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर प्रचंड सभेत झाले.



    दूध उत्पादकांत केवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारच्या निर्णया विरोधात नाराजी आहे हे यावरून दिसून येते.महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजू काढून घेतल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या सोबत बांधा वर दिवाळी साजरी करायला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंचा शेतकरी विषयक जिव्हाळा दिवाळ खोरीत गेल्यासारखे दिसत आहे.हा तर पुतना मावशीचा जिव्हाळा आहे असे कोल्हापुरातील या प्रचंड गर्दीने दाखवून दिले आहे.


   शेतकऱ्यांना दिलेली सरकारी दिवाळी भेट. दुष्काळ दौरे , कर्ज माफी, ऊस दर या सगळ्या गोड धोड फराळाची शेतकऱ्यांनी उलटी करून टाकली आहे. विशेष म्हणजे महायुतीला घटक पक्षातूनच खंडग्रास ग्रहण लागले आहे.महायुती ची अशी अवस्था होण्यामागे दोन कॅबिनेट मंत्री जबाबदार असल्याचे बोलले जाते. कांहीजण तर सरळ सरळ ना.चंद्रकांत दादा पाटील आणि ना.हसन मुश्रीफ यांचीच नावे घेतांना दिसत आहेत.समविचारीला मिळालेला हा पाठिंबा सहानुभूतीतून आहे.पराभभवाने हताश झालेल्या सत्ताधाऱ्यांनी जो मस्तीचा चाबूक उगारला आहे त्या विरुद्ध आहे.समविचारीने कोर्टातला लढा सुद्धा सुरू ठेवला आहे. त्याची पण शेतकऱ्यांना आता काळजी वाटत नाही.


'काय व्हईल ते होउदे कोर्टात जाऊदे.'

   दादा कोंडकेच्या गीतातील या ओळी सुद्धा कांहीच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. म्हणजे येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची आमची तयारी आहे असे उत्पादकांनी बोलून दाखवले.


    एक गोष्ट येथे प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे. दूध उत्पादकांचा पाठिंबा ना काँग्रेस ला आहे, ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे. किंवा ना महाविकास आघाडीच्या कोणत्याही इतर नेत्यांना आहे. त्यांचा पाठिंबा फक्त आणि फक्त सतेज उर्फ बंटी पाटील यांना आहे. जोतिबाच्या पालखी सारखे  शेतकऱ्यांनी त्यांना खांद्यावरून उचलून नाचवत नेले.


   यातून एक निष्पन्न झाले. शेतकऱ्यांना मदत आणि सहानुभुती पेक्षा त्यांच्या मतांचा सन्मान महत्वाचा वाटतो. पुढच्या निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या कोल्हापूरच्या नेत्यांना सुद्धा दूध आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बिलोरी आरसा दाखविला आहे.मनगटात पासून खांद्यापर्यँत बहिणींच्या राख्या बांधून  घेणाऱ्या मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आत्ताच सावध व्हायला हवे. लाडकी बहीण आणि बांधावरचा भाऊ तोपर्यंत तुम्हांला साथ देतील जोपर्यंत त्यांचा स्वाभिमान डिवचला जाणार नाही.



    या संघर्ष मोर्चाने केवळ कोल्हापूरी हिसका दाखवला नाही तर साऱ्या महाराष्ट्राला हलवून हलवून जागे केले आहे. जयंत पाटील, शरद पवार, यांचं येथे काही येत नाही. त्यांनी फक्त काखेत हात घालून होणाऱ्या गुदूगल्याना शांत करावे.तुमचे कसलेही योगदान यात नाही. सबकुछ बंटी.


यावेळी  खासदार शाहू महाराज छत्रपती,  राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहीते- पाटील, शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील- सरुडकर, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विवेकानंद पाटील यांच्यासह शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

   


     


          ------------------------