कोल्हापूर न्यूज / कोगनोळी प्रतिनिधी
नजिकच्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या चार दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील कर्नाटक सीमाभागाचे प्रवेशद्वार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची तपासणी करुनच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती तहसिलदार प्रकाश गायकवाड यांनी शनिवारी दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोगनोळी टोलनाक्यावर तहसिलदार विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावतीने कर्मचारी तैनात करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा कार्यकर्त्या आणि वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
याठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व चारचाकी वाहनांसह इतर वाहनांमध्ये असलेल्या प्रवाशांची तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवाशांच्यामध्ये कोणाला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांना परत पाठविण्यात येणार असल्याचेही तहसिलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी निपाणी सर्कल अधिकारी अजित वंजोळे, बेडकिहाळ सर्कल अधिकारी संजय नेमन्नावर, तलाठी एस.एन. पोवार, तलाठी के.एल.पुजारी, कोगनोळी ग्रामविकास अधिकारी डी.बी.जाधव, निपाणी तालुका ग्रामसहाय्यक एम.ए .मुल्ला, उमेश कोळी, एल.बी. पुजारी, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सलीम मुजावर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आर.बी. पिंपळे, एम.डी. युसुफखान, आरोग्य सेविका ए.एस. मधाळे यांच्यासह आशा कार्यकर्त्या व कर्मचारी टोलनाक्यावर तैनात करण्यात आले आहेत.
