कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी देत असताना महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीचे रोहीत्र जळण्याच्या घटना घडत असतात. अशा घटना घडल्यामुळे शेतकरी बांधवांच्या विद्यूत मोटारीचा वीजपुरवठा बंद होऊन त्याचा परिणाम त्यांच्या शेत पिकावर होत असताे. अशावेळी शेतकरी आपली पिके वाचविण्यासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे घालत असतात.
अशा वेळी अधिकारी कंपनी व कर्मचारी वर्ग रोहीत्र जळण्याच्या घटनेचे खापर शेतकरी बांधवावर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करतात व तुम्हाला जर ताबडतोब तुमचे रोहीत्र दुरूस्त करून पाहीजे असेल तर आमचे कर्मचारी घेऊन जा व टी.सी.काढून तो ट्रॅक्टरवर ठेवून आमच्याकडे पाठवा व तुमच्या ग्रुपमधील सर्व विद्यूत मोटार मालकानी टि.सी.(रोहीत्र) दुरूस्तीसाठी पैसे जमा करून द्या असे विद्युत मोटारधारक शेतकरी बांधवांना सांगितात . रोहीत्र दुरूस्तीसाठीची रक्कम शेतकऱ्यांच्या कडून घेऊन रोहीत्र दुरूस्ती करून दिले जाते .
पण रोहीत्र दुरूस्ती करण्याचे काम कंपनीने नेमलेल्या ठेकेदाराचे आहे.कृषी पंपाला वीजपुरवठा करणाऱ्या रोहीत्रात बिघाड झाला असल्यास विभागीय कार्यालयांतर्गत येणारे फिल्टर युनिटव्दारे हे रोहीत्र ठेकेदाराकडून बदलले जातात.रोहीत्रास लागणारे तेल व इतर दुरूस्ती करण्याची कामे महावितरणकडून केली जातात.
