कोल्हापूर न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यारोहण ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी सर्वांत मोठी अशी ऐतिहासिक घटना होती. छत्रपतींचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न या घटनेने संपन्न झाले आणि स्वराज्याला पहिले हिंदू छत्रपती सम्राट लाभले. याच घटनेला 350 वर्षे पूर्ण होत असताना याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसृष्टीमध्ये त्या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नरेह आंबेगाव येथे साकारत असलेल्या 'शिवसृष्टी' मध्ये अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय राज्याभिषेक दिनी संपूर्ण दिवस प्रत्येक तासाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले शिवराज्याभिषेकाचे वर्णनात्मक ऑडिओ व्हिडिओ च्या माध्यमातून शिवप्रेमींना शिवसृष्टी पाहता येणार आहे .
गुरुवार, दि 20 जून रोजी शिवसृष्टीला भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला प्रतिष्ठानच्या वतीने एक मोफत प्रवेशिका देण्यात येईल. ही प्रवेशिका पुढील 350 दिवस त्यांना कधीही एकदा वापरता येईल, अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी दिली आहे.