तेथे कर माझे जुळती ; स्व.सुनीता देवी घाटगे यांना सुमनांजली

Kolhapur news
By -

 

             


          कोल्हापूर न्यूज  /  वि . रा. भोसले


 स्व.सुनीता देवी घाटगे या मुरगूड हायस्कूल चे माजी शिक्षक श्री वसंतराव घाटगे यांच्या पत्नी आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या मातोश्री व विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या आजी

     घाटगे दाम्पत्य गेली पस्तीस वर्षे चोंडाळ ता.कागल येथील फार्म  हौस मध्ये रहायला आहे.

    या दाम्पत्याच्या आदर्श जीवन शैली कडे पाहिले की सहज उद्गार निघतात.


"तेथे कर माझे जुळती."

 

   वयाच्या शंभरी कडे हळू हळू प्रवास करणाऱ्या या  दाम्पत्याच्या संसार गाड्याचे एक चाक परवा निखळले.सौ.सुनीता देवींनी शेतातल्या आपल्या घरीच परवा आपला शेवटचा श्वास घेतला. सरांना मागे सोडून त्या निघून गेल्या.

      निवृती नंतर कांहीं दिवसांनी सर आणि सुनीता वहिनी दोघेही चौंडाळ मधील शेतात रहायला आले. सुरुवातीला घर तसे साधेच होते.समोरच्या चंद्रमौळी छपरातून आत गेले की सर एका खुर्चीवर निवांत बसलेले दिसायचे.

   दोघे ही पतीपत्नी आल्या गेलेल्यांचे आत्मीयतेने अतिथ्य करायचे. नवीन येणाऱ्याला वाटायचे या एवढ्या या शेतातल्या घरात हे रहातात कसे.अवती भवती एक किलोमीटर पर्यंत घर नाही ,शेजार नाही.घरची मुले, लेकी सूना नातवंडे अधून मधून असायचे.

  त्यांच्या त्यांच्या व्यापातून ते वेळ काढायचे.सर आणि वहिनी यांनी मात्र शेत सोडलं नाही.

     शेत कसलं .एक छोटं हील स्टेशन वाटावे असे रम्य ठिकाण .

    जुन्या घरा जवळ आता लाल घोटीव चिऱ्यांचा प्रशस्त बंगला उभा आहे.

    सभोवताली हिरवीगार शेती.शेतातल्या मातीशी दोघांचंही घट्ट नातं.

      माणसांशी सुध्दा तसंच नातं.

   आर्जवी भाषा शैली ,नम्र व निर्धार युक्त बोलणे ,प्रामाणिकपणा यामुळे विद्यार्थी व सहकारी यांच्यात आदरयुक्त दरारा सरांनी निर्माण केला होता.

    मुलांच्यावर सुध्दा उत्तम संस्कार.

   उतायचे नाही मातायचे नाही .कोणत्याही संकटाला आणि परिस्थितिला डगमगायचे नाही .सेवाभाव सोडायचा नाही .

     याच संस्कारामुळे या कुटुंबाने देशाला दोन खासदार दोनदा दिले. उत्तम वक्तृत्वातून प्रभावी नेतृत्व साकार झाले.

     तरीही या दांपत्याने कधि मोठेपणाचा दिमाख दाखवला नाही.

      निसर्गाच्या सानिध्यात दिवसा हिरवाईशी आणि रात्री आकाशातल्या तारकांशी गप्पा मारत त्यांनी साधका सारखे सुंदर आयुष कंठले.

     सुनिता मासाहेबांनी सरांना बिंनतक्रार सुदंर साथ दिली .

     त्यांच्या जाण्यांने शेतातली हळवी रोपे म्लान झाली असतील, रात्री सोबतीला असणारे चंद्र तारे दुःखी कष्टी झाले असतील.गोठ्यातल्या मुक्या जनावरांनी सुध्दा दोन अश्रू ढाळले असतील.

     एकमेकांना सत्तर वर्षाची साथ देणाऱ्या या खानदानी दाम्पत्या समोर नतमस्तक व्हावे आणि म्हणावे


  "येथे कर माझे जुळती"