कोल्हापूर न्यूज / वि.रा .भोसले
मध्यंतरी वृत्तपत्रातील एक बातमी वाचनात आली होती.
'एक किलो सोन्याचा मुकुट साईबाबांना अर्पण.'
डोळे विस्फारले ,डोके सुन्न झाले.
का बरं इतकं दातृत्व ?
केवळ स्वार्थ.खोट्या भक्तीच्या पडद्याआड लपलेली अंधश्रद्धा.
जे काय मिळालं ते बाबांच्या कृपेने असे समजून त्यांना सोन्याचा मुकुट अर्पण केला होता.
बाबा तर फकीर होते.त्यांना कशाला सोन ?
दातृत्वाचे असे अनेक किस्से आपण ऐकतो.कोणाला कृपा हवी असते,कोणाला कीर्ती ,कोणाला काळे धन लपवायचे असते .
एका पट्टीच्या खेळाडूने मात्र अशी कसलीही अपेक्षा न ठेवता गेली वीस वर्षे दातृत्वाची परंपरा जपली आहे.
या खेळाडूचे नाव आहे दगडु शेणवी.
विद्यार्थीदशेत स्वतः गरिबीचे चटके सोसले असल्याने गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम शेणवी यांनी स्थापन केलेल्या सानिका स्पोर्ट्स मार्फत गेली अनेक वर्षे सुरू आहे.
क्रिकेट,फुटबॉल चे सामने दरवर्षी या संस्थेमार्फत भरवले जातात.त्यांना महाराष्ट्र कर्नाटक मधून भरपूर प्रतिसादही मिळतो.
मुरगूड मध्ये खेळाचे एखादे मोठे मैदान सुध्दा नाही.मराठी शाळेच्या मोठ्या पटांगणात हे सामने भरवले जातात.मैदानात उतरणारे अनेक खेळाडू गरीब विद्यार्थी असतात.श्रीमंताच्या पोरांसारखे त्यांना ना गाडी ना घोडं.
पाठीवर फाटकी बॅग अडकून ही मुलं खेळायला यायची. खेळातलं कसब मात्र अप्रतिम असायचं.
अशी अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सानिका स्पोर्ट्सने त्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप सुरू केले आहे.यात पाहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांना स्कूल बॅग,वह्या ,कंपास बॉक्स इत्यादी साहित्य वाटण्यात येते तर ११वी,१२वी च्या विद्यार्थिनींना पावसाळी छत्र्या ,रेनकोट देण्यात येतात.
हे झालं विद्यार्थांसाठी.
आषाढी एकादशी करणाऱ्या वारकऱ्यांना केळी,खिचडी , रजिगरा लाडू असे फराळाचे साहित्य सुध्दा खुल्या जागेत वाटण्यात येते.एप्रिल मध्ये बाळूमामांच्या पालख्या गडहिंग्लज किंवा कर्नाटक भागातून येतात.त्यात अनेक श्रद्धाळू महिला सुध्दा असतात.या सर्व भाविकांना फराळाचे वाटप सानिका स्पोर्ट्स मार्फत दरवर्षी केले जाते.
हे दान निरपेक्ष असते.
त्यात एक प्रकरचा आनंद असतो असे सानिकाच्या खेळाडूंना वाटते.
देवाला दान देणारे अनेक असतात.न चुकता दानाची पावती घेतात.दुसऱ्यांना दाखवतात.हे बघा एवढं देवाला दान केलं.कांहीं जण दानपेटीत नाणी, नोटा टाकतात .ते निनावी बिन पावतीचे दान असते.त्याचा हिशेब देवाने करून दात्यावर कृपा करावी अशी श्रद्धा असते.
हे असले दान फक्त कांहीं अपेक्षा ठेऊन असते.वर्षातून एकदा दोनदा होत असेल.
सानिका स्पोर्ट्स मात्र दरवर्षी हे निरपेक्ष दान करत असते.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या युवक मंडळांना सुध्दा भोजन पुरवण्याचे काम सानिका ने केले आहे.
कोणतीही निरपेक्ष सेवा ही ईश्वरसेवा असते हा भाव ठेऊन सानिका चे खेळाडू हे उपक्रम राबवत आले आहेत.यात कसले राजकारण नसते किंवा कसले मिरवणे नसते.
दातृत्वाची दिशा देणारे असे उपक्रम स्तुत्य मानावे लागतील.

