कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नदीपात्रात असलेल्या मोटारी काढण्यासाठी गेलेले तीन तरुण नदीत वाहू लागले. हे विदारक व भयावह चित्र पाहून आजूबाजूला असलेले कोणीही घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करते. मात्र, नदीकाठालगत असलेल्या पवार दाम्पत्याने हे पाहिलं आणि ताईबाई पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या अंगावरील साडी काढत दोन्ही मुलांच्या दिशेने फेकली व त्यांनी दोन मुलांचे प्राण वाचवले. दुर्दैवाने या घटनेत एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ताईबाई पवार व त्यांच्या पतीच्या धाडसामुळे दोघांचे तरी प्राण वाचवण्यात आल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी-मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (25), अमोल भिमाशंकर तांगतोडे (30), प्रदिप भिमाशंकर तांगतोडे (28) व नारायण भिकाजी तांगतोडे (52) हे नदी किनारी मोटारी काढण्यासाठी गेले.
मात्र, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन जण पाण्यात वाहून जाऊ लागले. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या ताईबाई आणि छबुराव पवार या दोघांनी ही घटना पाहिली आणि त्यांनी या युवकांना वाचवण्यासाठी सुरुवात केली. तिघांना वाचवण्यासाठी जवळ काही नसल्यामुळे ताईबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडी काढत या तरुणांच्या दिशेने फेकली. या साडीचा आधार मिळाल्याने यातील दोघांचे प्राण वाचले आहेत. ताराबाई पवार व तिच्या नवऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आता कौतुक होऊ लागले आहे.

