कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार

Kolhapur news
By -

  

            


    


     


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


          अर्जुननगर, ता. कागल  येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने  गुरुपौर्णिमेनिमित्त १८ ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी "जीवनात गुरु व आईचे महत्व" या विषयावर मासा बेलेवाडी येथील निवृत्त केंद्र प्रमुख  कुशाप्पा पाटील यांचे व्याख्यान झाले.


या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. रघुनाथराव घोरपडे हे होते. उपस्थितांचे स्वागत संघाचे सचिव  अशोक तोडकर यांनी व प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष  दादासो पाटील यांनी केले. प्रास्ताविकामध्ये संघाच्या कार्याचा आढावा घेतला व कार्यक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.


  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना  कुशाप्पा पाटील यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईबरोबरच शिक्षकांचेही योगदान तितकेच महत्वाचे असल्याचे सांगितले. या दोघांशिवाय आयुष्य अपूर्ण असते. आई जन्म देते, मुलांसह घरातील सर्वांचा सांभाळ करते व घरातील सदस्यांसाठी आयुष्य खर्ची घालते. जीवनात एखादी व्यक्ती यशस्वी झाली तर ते यश हे प्रथम आईचे आहे, तसेच आपल्याला भेटलेल्या गुरुंचे आहे हे सर्वांनीच ध्यानात ठेवले पाहीजे. सध्या माता-पिता व शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. परंतु यांच्या शिवाय आपली प्रगती झाली असती का याचा विचार सर्वांनीच करायला हवा. आई ही मातीच्या गोळ्याला आकार देते तर शिक्षक प्रत्येक वि‌द्यार्थ्याला दिशा देण्याचे व त्याच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देत असतो. यावेळी सन्मानार्थी शिक्षक  संजय कांबळे,  रामा पोवार,  काका पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच चार धाम यात्रा करुन आलेले संघाचे सदस्य  आर. एम. चौगुले यांनी महिनाभरात पाहिलेली विविध ठिकाणे, धार्मिक स्थळे इ. बाबत उपस्थितांना माहिती दिली.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन  जयसींग चौगुले, नारायण लोहार, संजय जोशी यांनी केले. कार्यक्रमासाठी महिलांसह परिसरातील शिक्षक व संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदेमातरम होवून कार्यक्रम संपन्न झाला.