बाबा म्हणून शरद पवारांनी कधी हात उचलला का ? नाही ते डिपारमेंट आईकडे होते - सुप्रिया सुळे

Kolhapur news
By -

          


    मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातील भीष्म पितामह मानले जाते. ते केव्हाच भावनिक होत नाहीत. पण बाप म्हणून ते ही इतर बाप माणसांसारखेच हळवे आहेत. एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या लग्नाच्या गप्पा रंगल्या असताना शरद पवार यांनी स्वतः हात उंचावत आपण लेकीच्या लग्नात फारच भावनिक झालो होतो असे सांगितले. यावेळी सुप्रियांचे लग्न कसे ठरले? हेही त्यांनी खुमासदारपणे सांगितले.


शरद पवार तथा त्यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे यांच्या नात्याला अनेक कंगोरे आहेत. या दोघांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या नात्यातील गुंफण विषद केली. यावेळी शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांचे लग्न जमवतानाचा किस्सा सांगितला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी माझे लग्न जमवण्यात बाबांपेक्षा म्हणजे शरद पवारांपेक्षा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मातोश्री प्रतिभा पवार यांचीच जास्त भूमिका होती असे सांगितले.


    सुप्रिया सुळे यांनी शरद पवार हे फुल टाईम आजोबा असल्याचेही यावेळी सांगितले. शरद पवार फुल टाईम आजोबा आहेत. ते नातीशी फुल कनेक्ट आहेत. रेवती सुळे यांना आपले आजोबा कुठे गेले, त्यांना कोण-कोण भेटले याची खडानखडा माहिती असते. या गोष्टी मलाही माहिती नसतात, असे त्या म्हणाल्या.


शरद पवार राजकारणात केव्हाच भावनिक होत नाहीत. आपण केव्हाच त्यांच्या डोळ्यांत पाणी आलेले पाहिले नाही. त्यांचा स्वतःच्या भावनांवर कमालीचा कंट्रोल आहे. त्यामुळे ते आपल्या लेकीच्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या लग्नात रडले होते का? असा एक प्रश्नही यावेळी या बापलेकीला विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मला माहिती नाही, पण आई असे सांगते, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर शरद पवार यांनी स्वतःहून हात उंचावून आपण भावनिक झाल्याचे सांगितले. यावेळी सुप्रियांनी शरद पवारांनी आपल्यावर केव्हाच हात उचलला नसल्याचेही सांगितले. मी वडिलांच्या हातून केव्हाच मार खाल्ला नाही. ते साधे ओरडलेही नाही. कारण, ते डिपार्टमेंट आईकडे होते. ती खूप मारायची. पण पाय मारल्याचे मला आठवत नाही. तिने हाताने व पट्टीने खूप मारले, असे त्या हसत म्हणाल्या.