मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने ज्या महिलांना अद्याप योजनेचे पैसे मिळाले नाहीत. त्या महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे, तसेच बँकेत जाऊन आधार लिंक स्टेटसही पाहिलं जात आहे. त्यामुळे, बँकेत महिला भगिनींची मोठी गर्दी होतानाचे चित्र आहे. अशातच, महिलांचे बँक कर्मचाऱ्यांशी भांडण होत आहे. तसेच महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
बँक कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारची लोकप्रिय 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' मुळे बँकेत गर्दी वाढली असून महिला भगिनी बँकेत खाते उघडण्यासाठी येत आहेत. बँकेतील होणारी गर्दी पाहाता सुरक्षा आणि अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात यावे, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.

