उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शनिवार दि. २४ चा बंद मागे

Kolhapur news
By -

 

 


            



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुंबई  : उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणात सुनावणी करताना विरोधी पक्षांनी पुकारलेला उद्याचा दि २४ ऑगस्टचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. राज्यात कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही. त्यानंतरही कुणी बंद पुकारला तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोर्टाने या प्रकरणी दिला आहे.

         उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला  काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पक्षांनी उद्याचा बंद मागे घेत सकाळी ११  ते १२ या वेळेत तोंडाला काळी पट्टी बांधून शांततेत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.


बदलापूर येथील एका शाळेत ४ वर्षांच्या २ चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने शनिवारी  २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. या बंदला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर काही याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी झाली .