कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी अखेर भाजपला रामराम केला. ते आता ३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात केली. वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो, तो डाव शरद पवार हे तीन तारखेला जाहीर करतील असेही पाटील यांनी सांगितले. घाटगे यांच्या नव्या निर्णयाने महायुतीला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
महायुतीच्या जागा वाटपात कागल विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारीच जाहीर केली. यामुळे महायुतीतून उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री झाल्यानंतर घाटगे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या भावना समजावून घेतल्या. कार्यकर्त्यांनी पवार गटात जाण्याचा आग्रह केला. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याच्या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. घाटगे यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. वस्ताद नेहमी एक डाव राखून असतात. शरद पवार हे वस्ताद आहेत. येत्या तीन तारखेला ते डाव टाकतील अशी घोषणाच पाटील यांनी केली. दरम्यान, कागल येथील गैबी चौकात घाटगे यांचा पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
3 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी केले. जयंत पाटील यांनी सांगितले की पवार साहेब कायम समरजित घाटगे यांच्या पाठीशी राहतील. त्यामुळे समरजित घाटगे यांचं लीड किती असणार ते मोजा. समरजित यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असे जयंत पाटील म्हणाले. गेले वर्षभर माझ्या मनामध्ये असलेली चिंता आज मिटली असून त्यामुळे मी आनंद व्यक्त करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभेला तुम्ही दाखवून दिल आहे. आता विधानसभेला देखील दाखवून द्यायचं असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले , समरजितसिंहानी मेसेज पाठवला....मग आम्ही टप्यात आलं की लगेच कार्यक्रम करतो.

