शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून एकदा नव्हे अनेकदा माफी मागेन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Kolhapur news
By -

 

                   


 मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने आम्हाला वेदना झालेल्या आहेत. ही घटना व्हायला नको होती. परंतु, या घटनेनंतर आम्ही काल बैठक घेऊन दोन समित्या नेमल्या आहेत. जो पुतळा पडला त्याची चौकशी केली जाईल. तर दुसरी समिती ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने काम करणार आहे.


मुळात या घटनेवरून कोणीही राजकारण करू नये, शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून मी एकदा नव्हे अनेकदा माफी मागेन, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांच्या तीव्र भावना लक्षात ठेवून अजित दादांनी माफी मागितली. शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. त्यावर राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही राजकारण करू नये. आम्ही त्याच ठिकाणी नौदलाच्या मदतीने शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार आहोत, अशी ग्वाही देतो.


       विरोधकांनी राजकारण करू नये


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजित दादांनी शिवरायांच्या पुतळ्यावरुन महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली. ते महायुतीचे भाग आहेत. अजित दादा किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा मी आम्हाला शिवाजी महाराजांच्या कोणत्याही प्रकरणात राजकारण करायचे नाही. विरोधकांनी देखील राजकारण करू नये, असे माझे त्यांना आवाहन राहील. मुळात राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकीय मुद्दा होऊच शकत नाही. शिवराय आमचे दैवत आहेत. त्यांच्या आदर्शावर महाराष्ट्र राज्याचा कारभार चालतोय, हे देखील  लक्षात ठेवले पाहिजे .