कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे : सरकारचे ग्रामपंचायत घटकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी येत्या १६ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन होणार आहे. या कामबंद आंदोलनात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांचा समावेश आहे.
सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सुमारे अडीच लाख लोक सहभागी होणार आहेत. याचा परिणाम राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींवर होणार आहे. यामुळे लाडकी बहीण योजना, पीकविमा अर्ज भरण्याचे काम थांबणार आहे. तसेच एकाच वेळी अनेक ग्रामपंचायतींचा कारभार बंद झाल्यास नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान २८ ऑगस्टपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय संरपंच परिषदचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे.
या आहेत प्रमुख मागण्या...
नियमित व सन्मानजनक मानधन, भत्ता मिळावे
सरपंचांना १५ हजार, उपसरपंचाना १० हजार, तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे
ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे
मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे
ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करून वेतननिश्चिती करावी
संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या आकृतिबंधात आणावे
यावलकर समितीचा अहवाल त्वरित लागू करावा
संगणक परिचालकांच्या भार ग्रामपंचातीऐवजी शासनाने उचलावा
ग्रामपंचायतीना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन
विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा

