बारामती नंतर कागल मध्ये 'पॉवर गेम' रंगणार का ?

Kolhapur news
By -

    



कोल्हापूर न्यूज  /  वि.रा .भोसले, ज्येष्ठ पत्रकार


      स्व.सदाशिवरावजी मंडलिक आणि स्व.विक्रमसिंहजी घाटगे यांच्या कर्तृत्वाला दाद दिलीच पाहिजे. कागलच्या विकासाची क्षितिजे उजळवून टाकण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्याच काळात एक घोषणा वारंवार ऐकायला मिळायची .


    कागलची बारामती करू


    याचा अर्थ बारामती जसे प्रगत झाले आहे तसे कागलला पण करू.

    

     बारामती चे बारसे फार दिवस टिकले नाही कारण कागल विधानसभा मतदार संघ दुसऱ्या एका संबोधनाने प्रख्यात झाला.


   कागल हे राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले.


दोघांचा राजकीय संघर्ष पण टोकाला पोचला होता.साऱ्या महाराष्ट्राला कागलची नव्याने ओळख झाली.

       आज पुन्हा एकदा कागल चर्चेत आले आहे.

 बारामती पुन्हा कागलमध्ये अवतरणार काय ?

   

लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली.सुप्रिया सुळे यांनी ती जिंकली.

    वास्तविक काका आणि पुतण्या यांच्या मधली ती एक पॉवर गेम होती असे म्हंटले तर वावगे होणार नाही.

   शरद पवार यांनी इंडिया आघाडी कडे संविधान बचाव नावाचे फसवे आयुध सोपवले होते.त्याचा परिणाम देशभर पहायला मिळाला.

     भाजपचा Think Tank येथे कमी पडला.संविधनाशी कसलीही छेडछाड  झालेली नाही किंवा होणार नाही हे सिद्ध झाले.उलट पन्नास पेक्षा अधिक वेळा काँग्रेस राजवटीत ती कशी झाली होती हे नव्या एन डी ए सरकारने दाखवून दिले.

    पण महविकास आघाडीला त्या निवडणुकीत चांगलेच बाळसे आले .विधानसभेमध्ये सुध्दा आपण बाजी मारू अशा आविर्भावात ही आघाडी आहे.

   जनता जनार्दनाची नाडी कधीच हाती लागत नाही पण निवडणुकीचे बाशिंग बांधायला तत्पर असलेल्या इच्छुक उमेदवार मंडळीत तसा भ्रम पसरवायला आघाडीने सुरुवात केली आहे.

    महायुतीचा पण आत्मविश्वास थोडा ढळला असावा .लाडकी बहीण योजना किंवा शेतकऱ्यांना मोफत वीज वगैरे सुविधा देण्याचे जाहीर कार्यक्रम युतीने सुरू केले आहेत.

    त्याला शह देण्यासाठी आघाडीने आतापर्यंत कधी आचरणात न आणलेले बंद, काळ्या फिती वगैरे नवे प्रकार आणले आहेत.

   थोडक्यात आगामी विधानसभा निवडणुका हे सर्वांचे लक्ष आहे.

   याच पार्श्वभूमीवर कागल मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  या वेळी प्रमुख लढत विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे यांच्यात होईल अशी चिन्हे आहेत.

    हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार असतील व समरजीत सिंह हे शरद पवार गटा मार्फत उमेदवार असतील हे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

    थोडक्यात ही लढाई बारामती प्रमाणे पुन्हा दोन पवार गटात होणार असे दिसते.

    हसन मुश्रीफ हे पाच वेळा आमदार झालेत.विविध मंत्रिपदे सुध्दा त्यांनी भूषविली आहेत.जनसंपर्क दांडगा आहे.विकास कामात व निधी खेचण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. कागलच्या चार राजकीय गटात त्यांच्या गटाचा समावेश आहे.त्यापैकी संजय घाटगे गटाने त्यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

    माजी खासदार संजय मंडलिक हे महायुतीत आहेत.त्यामुळे त्यांना अजित दादांना म्हणजे हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देणे धोरणात्मक दृष्ट्या क्रमप्राप्त आहे.

     कागल मध्ये त्यांना म्हणावी तशी मतांची आघाडी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. समरजीतसिंह हे सुध्दा कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे मानकरी किंवा मुजरे करी असल्याने त्यांचा ही पाठिंबा हाताला गेला असला पाहिजे असाही एक समज मंडलिक गटात झाला आहे.

    शाहू महाराजांचे कसलेही काम नसताना त्यांना जी मते मिळाली ती काँगेस पक्षांमुळे मिळाली हे पूर्ण चुकीचे आहे.छत्रपतींच्या गादीचा मान राखायला पाहिजे ही जनभावना निर्माण झाली व त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली.विधानसभेला हे गणित लागू पडेल असे नाही. 

    शरद पवार मराठा आरक्षणाची खेळी करण्याच्या तयारीत आहेत.तथापि युतीमधील अनेक मराठा नेत्यांनी हे फसवे आयुध असल्याचे  म्हंटले आहे. 

   लोकसभेत मुल्ला मौलविना पुढे करून इंडी आघाडीने मुस्लिमांची मते मोदी विरोधी करण्यात थोडे फार यशही मिळवले.वाराणशी व अयोध्येत ते दिसूनही आले.

    हसन मुश्रीफ हे मुस्लिम आहेत.कसलेले राजकारणी आहेत. समरजीतसिंह हे स्वच्छ चेहऱ्याचे व धडपडीचे उमेदवार आहेत.कागल मध्ये भाजपाला त्यांनी चांगले स्थान मिळवून दिले होते.त्यांनी मागील निवडणुकीत ९० हजारापर्यंत मजल मारली होती.संजय घाटगे यांनी ५५ हजार व मुश्रीफ यांनी १ लाख १४हजार पर्यंत मते मिळवली होती.संजय मंडलिक यांचा पाठिंबा मुश्रीफ यांना होता.

   या सर्व घडामोडींचा विचार करता मुश्रीफ यांना ही निवडणूक तितकी सोपी नाही आणि समरजीत यांनी सुध्दा  हुरळून जावे अशी स्थिती नाही.

  महायुती आणि महाआघाडी असे हे युद्ध आहे.गट तट हे या आघाड्यांच्या फांद्या आहेत.म्हणजेच कागल मध्ये अजित पवार व शरद पवार अशी काका पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.


    बारामती नंतर कागलातील या पॉवर गेम कडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे .