कोल्हापूर न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशाळगडावर सापडलेल्या एका नवीन प्रकारच्या वनस्पतीला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रजातीचे 'सेरोपेजिया शिवरायीना' असे नामकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारे एका वनस्पतीच्या प्रजातीला आंतरराष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंदीलपुष्प कुळातील या वनस्पतीला शिवरायांचे नाव देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आम्हाला संधी मिळाली, असे मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.
कोल्हापुरातील न्यू कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागातील अक्षय जंगम, रतन मोरे, डॉ. निलेश पवार यांच्यासह चांदवड येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. एस. आर. यादव यांच्या संघाने या कंदीलपुष्प वर्गातील वनस्पतीचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे या संदर्भातील शोधनिबंध न्युझीलँड येथील प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे या वनस्पतीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांकडून देखील दाखल घेतली जाणार आहे.
अक्षय जंगम आणि डॉक्टर निलेश पवार हे गेल्या सहा वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर वनस्पतीचा अभ्यास सुरू असताना त्यांना ही वनस्पती आढळली. ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील ही वेगळी वनस्पती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरचे आणि सध्या नाशिक येथे कार्यरत असलेले या विषयातील तज्ञ डॉ. शरद कांबळे यांनी या वनस्पतीची माहिती दिली. डॉ. शरद कांबळे यांनी देखील या वनस्पतीची पाहणी केली. त्यांनीच ही नवीन प्रजातीची वनस्पती असण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांनी आतापर्यंत सहा नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी निरीक्षण केल्यानंतर ही नवीन वनस्पती असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच हा शोध निबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.

