कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कनिष्ठ महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या शिक्षकांना नियमित वेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय माहिती आणि तंत्रज्ञान विषय शिक्षकांच्यामधून हाेत आहे.
सन २००१ पासुन सुरु असलेल्या अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान (आय टी) ह्या एकाच वैकल्पिक विषयास अजुनही अनुदानीत केले नाही. आयटी विषयाचे शिक्षक मागील २३ वर्षापासून वेतन अनुदानापासून वंचित आहेत. तंत्रज्ञानाच्या डिजिटल इंडिया या युगात माहिती तंत्रज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे. भविष्यातील आदर्श पिढी, सुजाण नागरिक घडवीण्यासाठी गेली २३ वर्षापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे ज्युनिअर कॉलेजचे आय टी शिक्षक त्यांचा शासन नियमानुसार ३ वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पुर्ण होऊनही तूटपुंजा मानधनावर काम करीत आहेत. शासनाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुदानित उच्च माध्यमिक महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान आय टी विषयास अनुदानित करावे. या विषय शिक्षकांना त्यांची नियुक्ती दिनांकापासूनची सेवा ग्राह्य धरून इतर नियमीत विषय शिक्षकांप्रमाणे वेतन अनुदान मंजूर करावे व शिक्षकांना वेतन द्यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यातआली आहे.
-------------------------------------
अनुदानित काॅलेजमधील आय टी विषयास अनुदान देऊन विषय शिक्षक जे २४ वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत त्यांना त्यांची नियुक्ती दिनांकापासूनची सेवा धरून वेतन अनुदान व इतर अनुदानित शिक्षकांप्रमाणे सर्व सोई व सुविधा मिळाव्यात. काही शिक्षकांची सेवा तर ३ते ८ वर्षे राहीली आहे व आत्ता शासन इतर विषयांवर समायोजन करणार असे सांगत आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. शासनाने आहे त्याच पदावर विषयास अनुदान देऊन शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे व आम्हाला न्याय द्यावा.
- सुषमा पाटील
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेज
कोल्हापूर
------------------------------------------------