मुंबई:केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेणार आहे. या बैठकीमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून, त्याला या बैठकीनंतर हिरवा कंदील मिळेल असा दावा केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पुढील महिन्यात केव्हाही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांची वाट पाहणाऱ्या सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने आपले कान टवकारलेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 27 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन सलग दोन दिवस राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या बैठकीत राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेऊन हे पथक संबंधितांना योग्य ते दिशानिर्देश व सूचना करेल असा अंदाज आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्यातील सणवार व इतर महत्त्वाचे दिवस पाहून या बैठकीत निवडणुकीची तारीख ठरवली जाईल असे सांगितले जात आहे.