शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारपासून (दि. ३) प्रारंभ होत आहे. यंदाच्या नवरात्राचे वैशिष्ट्य म्हणजे २१ वर्षांनंतर यंदा अत्यंत दुर्मिळ असा सुवर्णकांचन योग या काळात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हस्त नक्षत्र आणि इंद्र योग या दोन विशेष योगांवर घट स्थापना आणि अश्विन नवरात्रोत्सव संपूर्ण नऊ दिवस होत असल्याने येणारा कालखंड समाजासाठी उत्साह, आनंद घेऊन येणारा असल्याचे धर्मशास्त्र अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवाची लगबग घरोघरी दिसून येत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाचे महत्त्व धर्म शास्त्र अभ्यासकांनी उलगडून सांगितले...
२१ वर्षांनंतर येत असलेल्या या पुण्य पर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे, शतचंडी होम हवन (पूर्णाहुती) अष्टमीला होते, तीदेखील या वर्षी शुक्रवारी आली आहे. घट (कलश) नऊ दिवस, नऊ माळा घालून, दहाव्या दिवशी घट उत्थापन (घट उठणार) आहे.
अशा दुर्मिळ योग पर्वामध्ये देवीची केलेली पूजा अथवा सेवेचे फळ अतिशीघ्र मिळते. यामुळे देवीची पूजा, सेवा मनोभावे करावी, असे डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितले.
-------------------------
येणारा काळ आनंददायी
सर्वसाधारणपणे घटस्थापना चित्रा नक्षत्रावर होते. मात्र, या वर्षी घटस्थापना हस्त नक्षत्रात होणार असून इंद्र योग आलेला आहे. २१ वर्षांनंतर असा सुवर्णकांचन योग आला आहे. नवरात्रही पूर्ण नऊ दिवसांचे आहे. त्यामुळे नवरात्रानंतर येणारा कालखंड देवीच्या भक्तांबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही आनंददायी, उत्साहवर्धक असेल. दिवाळीतही खूप उत्साह दिसून येईल. सर्व मरगळ दूर होईल.
- डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक
-------------------------------------------------