कागलात विधानसभेचा कल मंडलिक गट ठरवणार का ? ; चर्चेला उधाण

Kolhapur news
By -

 

         


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     कागलचे विधान सभेचे वातावरण तसे महिनाभरापासून तापले आहे.या मतदार संघात दोन तगडे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.

     पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून घड्याळ या चिन्हावर तर समरजितसिंह घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवतील.

    दोघांची प्रचार यंत्रणा जय्यत आहे.सोशल मिडिया वर दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपापल्या उमेदवाराचे जोरदार समर्थन करत असतात.

   वैशिष्ठ्य असे की विख्यात कवी आणि लेखक यांना सुध्दा लाजवेल अशी शब्द प्रतिभा या समर्थकात पहायला मिळते.विनोदी चुटके, काव्ये,व्यंगचित्रे,फोटो, व्हिडीओ यांची रेलचेल असते.राजकारणात रस असणारे लोक घरात,रस्त्यात,शेतात,बस मध्ये,दुचाकीवर  सुध्दा मोबाईलने झपाटलेले दिसतात.

 "साहेबच येणार.राजेच येणार." 

असं म्हणत पैजा सुध्दा सुरू झाल्या आहेत.

     या काटाजोड कुस्तीचा जरा आढावा घेऊया.

   २०१९ च्या निवडणुकीत हसन मुश्रीफ हे अंदाजे २६ हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आले होते.

 समरजितसिंह हे नजदीक चे प्रतिस्पर्धी होते .त्यांना ८९ हजार पर्यंत मते मिळाली होती.तिसरे स्पर्धक माजी आमदार संजय घाटगे यांना ५५ हजार मते मिळाली होती.

    या दोन्ही उमेदवारांची ही मते त्यांची स्वतःचीच होती.हसन मुश्रीफ यांना मात्र त्यावेळी मंडलिक गटाचा पाठिंबा मिळाला होता.

'भातावर वरण.'  

  म्हणतात ते यालाच.

   

 या वेळी दोन महत्वाचे बदल दिसतात.एक म्हणजे ही लढत तिहेरी नसून दुहेरी होईल.दुसरा महत्वाचा बदल म्हणजे मागच्या वेळचे उमेदवार संजय घाटगे यांनी निवडणूक न लढवता सरळ मंत्री हसन मुश्रीफ यांनाच पाठिंबा जाहीर केला.उ.बा.ठा ची नाराजी पत्करून त्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या समर्थकांनी सुध्दा उचलून घरला.त्यामुळे उ.बा. ठा. चा कागलातील तंबू जवळजवळ कोलमडलाच असे म्हणावे लागेल. 

     केडर पद्धतीच्या  राजकारणात गटा तटाना  अधिक महत्व असते.संजय घाटगे यांचा गेल्या चाळीस वर्षांचा गट अजून अभेद्य आहे.त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर  संचालक म्हणून संधी मिळाली .त्यामुळे गट अधिक मजबूत झाला.

   संजय घाटगे गटाने ५५ हजार मते त्यांच्या पारड्यात टाकली होती.ही मते आता ना.मुश्रीफ यांचेकडे वळण्याची शक्यता आहे.

    रहाता राहिली मंडलिक गटाची मते.

    मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली .त्यात मंडलिक गटाचे अध्वर्यू संजय मंडलिक यांना हार पत्करावी लागली.

    ना.मुश्रीफ यांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला होता.लीड किती मिळणार हेही जाहीर केले होते. मतदाना दिवशी सकाळी सहाला बूथ पहायला त्यांनी सुरुवात केली होती. तरीही संजय मंडलिक यांचा पराभव झाला.

    केवळ त्यांचाच नाही तर युतीच्या ४८ पैकी ३१उमेदवारांचा पराभव झाला.असे असले तरी मंडलिक गटाला  आलेल्या नैराश्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विविध प्रतिक्रिया ऐकू येत होत्या.वार्ड निहाय लेखा जोखां मांडण्यात तळातील कांहीं कार्यकर्त्यांनी अनेक दिवस घालवले. खुद्द संजय मंडलिक यांनी मात्र हा पराभव प्रामाणिकपणाने स्वीकारला व 'संशय कल्लोळ' नाटकावर पडदा टाकला.ते ही महायुतीचेच असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार या नेत्यांच्या बरोबर त्यांना काम करावे लागणार असल्याने त्यांचा पाठिंबा ना.मुश्रीफ यांना राहील असा अंदाज आहे.

   

 इकडे समरजितसिंह घाटगे यांनी सुध्दा जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सगळा शाहू ग्रुप आणि  नवयुवकांच्या गावोगावच्या संघटना त्यांचे झेंडे फडकवताना दिसतात.माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी यांनी व उत्तुर भागातील काही  कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. 

     देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जवळचे मानले होते .त्यांना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद दिले होते तरीही त्यांनी एका हिसक्यात कमळ तोडून टाकले व तुतारी घेतली .त्यामुळे भाजप कार्यकर्त्यात नाराजीचा सूर होता.संजय घाटगे यांच्याप्रमाणे त्यांना ही गटातील ग्रास रूट कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे. 

     अजून उघड प्रचार सुरू नसला तरी गल्लीबोळात,घरोघरी व सोशल मीडियावर वातावरण तापू लागले आहे. 

   सर्वांचा उत्साह  चहा पेक्षा किटली गरम असा ओसंडून वाहू लागला आहे.

   मंडलिक गटाच्या निर्णयावर पारड्याचा कल ठरू शकणार का  ? या चर्चेला उधाण आले आहे.


                        ------------