कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
रामायण महाभारत काळापासूनचा इतिहास पाहिला तर राजा कोण होणार हे महिलाच ठरवत आल्या आहेत. भरताला राजगादी मिळावी म्हणून कैकेयिने हट्ट धरला आणि रामाला १४ वर्षाच्या वनवासाला पाठवले. भरताने मात्र राम पादुकांची पूजा करून त्याच्या वतीने कारभार पाहिला असला तरी नंतर रामचरणी राज्य अर्पण केले.त्यागाच ते विलोभनीय रूप पाहून पश्चातापदग्ध कैकयी ढसा ढसा रडली.नेपाळच्या जनकपुरीचे वैभव भोगणाऱ्या सीतेने रामाला वनवासात जशी साथ दिली तशी एका धोब्याचे टीकास्त्र वर्मी लागल्याने मानसिक दृष्ट्या घायाळ झालेल्या रामाने गर्भवती सीतामाईचा त्याग करायचे ठरवले.वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात तिला रहावे लागले.लव कुश या तेजस्वी मुलांना जन्म दिला.याच मुलांनी रामाचा अश्वमेध अडवला. राज्य पुढे त्यांच्याकडेच आले.
महाभारतात द्रौपदीने सुध्दा पांडवासमवेत वनवास भोगला .तिच्याच सन्मानासाठी पांडवांनी कुरु क्षेत्रावर म्हणजे कौरवांच्याच भूमीवर त्यांना हरवून राज्य मिळवले. द्रौपदी विजयी झाली.याच थोर महिलांनी राज्ये घडवली ,वाढवली आणि सुंदर भारतीय संस्कृतीला जन्म दिला.हीच संस्कृती महाराष्ट्रीय महिलांनी जोपासली आहे. त्यामध्ये ,श्रीमंत,मध्यमवर्गीय आणि गरीब महिला सुध्दा आहेत. कष्ट,दारिद्र्य पुरुषी वर्चस्व यांचा वनवास भोगलेल्या कोटयावधी सीतामाई आणि द्रौपदीमाई महिलांचा सन्मान करणारी भव्य दिव्य ऐतिहासिक महिला सबलीकरण योजना भारत सरकारने पहिल्यांदाच आणली.स्त्री ही केवळ एक भोगवस्तू आहे असे मानणाऱ्या कट्टर पंथीय विचारसरणीला आव्हान देत सरकारने सर्व समुदायांच्या महिलांसाठी ही योजना अमलात आणली आणि राबविली.
केंद्र सरकारचे महिला सबलीकरणाचे हे धोरण महाराष्ट्र सरकारने सुध्दा राबवायचे ठरवले व मध्यप्रदेशच्या धरतीवर लगेच अमलात सुध्दा आणले.दिपावलीच्या ऐन हंगामात आलेली दरमहा २१ शे रुपयांची लाडकी बहिण योजना ,अंगणवाडी महिलांना १५ हजारांचे सुरक्षा कवच यामुळे महिला वर्गात खुशीचे वातावरण आहे.या योजनांना विरोधकांनी 'भाऊबीज नव्हे भिक ' अशी हेटाळणी केली.महिला वर्गातील प्रतिसाद पाहून अलीकडे विरोधी आघाडीने सुध्दा जाहीरनाम्यात अशा महिला योजना मांडल्या आहेत.जाहीर भाषणात सुध्दा आता त्यांचा उल्लेख होऊ लागला आहे.सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.महिलांची ताकद काय असते हे पुरुषप्रधान राज्यकर्त्यांना व राजकारण्यांना सुध्दा कळले आहे.
महाराष्ट्रात महिलांना एस टी ची अर्धी प्रवास सवलत दिली आहे.विरोधकांनी आता कर्नाटकच्या धर्तीवर महिलांना पूर्ण प्रवास सवलत देण्याची घोषणा केली आहे. महिलांचे भावविश्व वेगळे असते.कृपाळू ,दयाळू,मायाळूपण आणि कृतज्ञता त्यांच्यातच अधिक पहायला मिळते. नेमका हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. निम्मा मतदारसंघ स्त्रियांचा आहे याची जाणीव राजकारण्यांना झाली आहे.
महाराष्ट्रावर राज्य कोण करणार हे याच मतदारांच्या हाती आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
-------------------------

