मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आज दुपारी महायुतीमधील नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द...
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका... सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष... राज्याच्या राजकारणात सध्या सर्वांच्याच केंद्रस्थानी एक नाव कायम आहे... ते म्हणजे देवेंद्र फडणवीस.... तब्बल 40 वर्षानंतर आपला पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरलेले देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रातील राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले आहेत. नागपूर महापालिकेतून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय जीवनात पाय रोवले. अवघ्या 22 व्या वर्षी ते नगरसेवक झाले होते. मग सर्वात तरूण महापौर ठरल्याची नोंद देखील फडणवीसांच्या नावावर आहे.
देवेंद्र फडणवीसांनी नागपूर विद्यापीठातून आपले एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले आहे. तर व्यवसाय व्यवस्थापन विषयाची त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे. यानंतर त्यांनी डी. एस. ई. बर्लिन या जर्मनीतील संस्थेमधून 'डिप्लोमा इन मेथड्स अॅन्ड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट'चा अभ्यास केला.
यानंतर 1990 मध्ये नागपूर पश्चिम कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1992 मध्ये त्यांच्यावर भाजयुमो, नागपूर शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. याच काळात ते अवघ्या 22 वर्षी नगरसेवक म्हणून देखील निवडून आले. तर अवघ्या दोन वर्षांमध्ये त्यांना भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. यानंतर 1997-2001 मध्ये त्यांची नागपूरचे महापौर म्हणून निवड झाली. याच कार्यकाळात मेअर इन कौन्सिल या पदावर काम करत असताना त्यांना भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १९९९ मध्ये पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले.
२०१४ ते २०१९ सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली .
-----------------------------

