प्राजक्ता माळीस ज्येष्ठ पत्रकार व संपादक संजय आवटे यांचे पत्र

Kolhapur news
By -

              



  प्रिय प्राजक्ता, 


आताच तुझी पत्रकार परिषद पाहात होतो. थक्क झालो. तुझी देहबोली, भाषेचा अचूक आणि नेमका वापर, संयत-सुसंस्कृत, तरीही खणखणीत मांडणी यामुळे तुझे सगळे मुद्दे कमाल परिणामकारक झाले आहेत. एखाद्या स्त्रीवादी विचारवंतालाही जो परिणाम साधता येणे शक्य नाही, एवढे प्रभावी. 

सलाम तुला त्यासाठी. या पत्रकार परिषदेतलं तुझं रूप माझ्या मनावर अक्षरशः कोरलं गेलंय. 


प्राजक्ता, या जातपितृसत्ताक व्यवस्थेत तुझ्यासारखी, एका सामान्य घरातली मुलगी स्वबळावर काही करू पाहाते, नाव मिळवते, पैसे कमावते, तेव्हा तिला काय काय सहन करावे लागते, याचा अंदाज अशावेळी येतो. ‘Oh woman, anatomy is thy destiny’... ‘बाई गं, शरीर हीच तुझी नियती आहे’, हे वारंवार अधोरेखित व्हावे, असे प्रसंग तर नित्य समोर येत असतात. एखाद्या अभिनेत्रीच्या रीलवरच्या प्रतिक्रिया असोत किंवा बाईबद्दल सहजपणे खासगीत होणार्‍या कमेंट्स असोत, आपण नक्की कोणत्या शतकात आहोत, असाच प्रश्न पडत असतो. सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या अनेक महिलांना अस्वस्थ करणारा अनुभव दररोज येत असतो. जग खुले होत असताना, महिलांच्या वाट्याला येणारे हे भयंकर जग सर्वत्र दिसत असते. राजकारण, मनोरंजन वा सिनेमासारख्या क्षेत्रात शरीराच्या बळावरच सामान्य बाईला यश मिळू शकते, असा समज एवढा पसरवला गेला आहे की, कोणत्याही यशस्वी महिलेकडे याच अंगाने पाहिले जाते. स्वतंत्र प्रज्ञेच्या महिलांनी इकडे येऊच नये, असे हे कारस्थान आहे. ‘कॉम्प्रोमाइज’ हा शब्द एवढा परवलीचा झाला आहे की, त्याशिवाय या जगात यश मिळणे अशक्य आहे, असे वातावरण तयार करण्यात पुरूषसत्तेला यश आले आहे. शिवाय, या पुरूषसत्तेच्या अनेकदा स्त्रियाच वाहक असतात. त्यामुळे ही सत्ता अधिकच बेमुर्वतखोर आणि निरंकुश होत चालली आहे. बाईने कसले कपडे घालावेत, हे ठरवणारे ‘सुसंस्कृत’ लोक स्वतः मात्र तिच्याकडे पाहाण्याची आपली नजर बदलत नाहीत. गौतमी असो वा मानसी, यांच्या रील्सवरच्या अनेक कमेंट्स हा अपवाद नाही, तर ती इथल्या पुरूषांची ‘नार्को टेस्ट’ आहे. हे असले पुरूष रितेश-जेनेलियाच्या पोस्टवर मात्र फार कौटुंबिक कमेंट्स करत असतात. बाई अशी हवी, जेनेलियासारखी. छान नवरा, मुलं. घर सांभाळणारी. एकदम खानदानी, सुसंस्कृत! नवरा नसलेली, नवरा सोडलेली, एका वा अनेक मित्रांसोबत राहणारी बाई तर चवचाल. म्हणजे ती आपलीच मालमत्ता. ती आपल्याला मिळावी, अशी फॅंटसी, पण मिळत नाही तर व्हर्च्युअली मिळवा, नाहीतर तिला बदनाम करा. 


तुला सांगू प्राजक्ता, अगं या व्यवस्थेचा कटच असा आहे की, स्त्रीला भीती दाखवायची पुरूषांची आणि मग पुरूषांच्या पायाशी यायला तिला भाग पाडायचं. धर्माची भीती दाखवून धर्मालाच शरण यायला भाग पाडणारे राजकारण आणि हे कारस्थान यात समान सूत्र आहे. धर्मांध पाकिस्तानची भीती दाखवून दुसरे धर्मांध राजकारण यशस्वी करण्याचा कट असतो ना, तसे आहे हे. माध्यमं तर वाहकच आहेत या कटाची. टीआरपी नि व्ह्यूज-लाइक्सनं आंधळी झालेली माध्यमं ॲनस्थेशियाचं काम करताहेत सध्या. कोणाचं काय होईल, याची चिंता ते कशाला करतील?


तुला सांगू? बाईला ‘माणूस’ म्हणून जगायचे असेल, तर पहिल्यांदा तिला धर्मांध आणि विखारी राजकारणाच्या विरोधात उभे राहावे लागेल. एकीकडे धर्मांध राजकारणाला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे बाईला ‘माणूस’ म्हणून जगता आले पाहिजे, अशी भूमिका घ्यायची, हे कसे शक्य आहे? स्त्रीला जोखडातून मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापितांचा मार खात ‘मनुस्मृती’ जाळली. कधी वाचलास तू हा इतिहास? बाईला विवाहसंस्थेच्या, जातपितृसत्तेच्या तुरूंगातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिला’चा आग्रह धरला आणि नेहरूंनी पुढे तो प्रस्ताव सिद्धीस नेला. त्यापूर्वी महात्मा फुले- सावित्रीबाई-फातिमा यांनी दगडगोटे खात मुलींना शिक्षणाची वाट दाखवली. हीच ती वाट आहे, जी बाईला आणि पुरूषालाही माणूसपणाकडे घेऊन जाणार आहे. या वाटेवर यायचे नाही. भलत्याच वाटेने जायचे आणि पुन्हा वाटमारी होत असल्याची तक्रार करायची, असे नाही ना चालणार. हे ‘पॅकेज’ आहे. धर्मांध राजकारण बाईकडे माणूस म्हणून नव्हे, ‘मादी’ म्हणूनच बघणार. प्राजक्ता, या राजकारणाला विरोध करण्याची हिंमत आपण दाखवणार का? 


तुझा ‘फुलवंती’ मी पाहिला नाही. तसं मी तुझं फार काही पाहिलेलं नाही. मात्र, स्क्रीनवरचा तुझा वावर छान असतो. मलाही तो आवडतो. लोकांना तू आवडतेस. गोड वाटतेस. तुझे खूप चाहते आहेत. ‘फुलवंती’ ही काहीतरी पेशवेकालीन गोष्ट आहे. त्यात तू नर्तिका आहेस, असे काही मी वाचलेय. तुला ठाऊक आहे, प्राजक्ता? पराक्रमी थोरल्या बाजीराव पेशव्यांवर याच धर्मसत्तेने केवढे अन्याय केले आणि मस्तानीला काय सोसावे लागले! ज्या ‘रमा-माधव’चे आजही आपल्याला कौतुक असते, त्या रमाबाई पेशवे ऐन विशीत सती प्रथेच्या नावाखाली जिवंत जाळल्या गेल्या. त्यानंतर रमाबाई डोंगरे नावाची ब्राह्मण विदुषी जातपितृसत्तेवर प्रहार करते म्हणून तिला धर्मबहिष्कृत व्हावे लागले! त्याच त्या पंडिता रमाबाई. या सगळ्यातून बाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न ज्या राजकारणाने केला, त्याला पाठिंबा देण्याऐवजी, तुम्ही बाईला जाळणार्‍यांच्या गोटात सहभागी होणार असाल तर हे चित्र बदलेल, अशी अपेक्षा कशी करायची? 


प्राजक्ता, तुझा उल्लेख ज्या प्रकारे झाला, त्यामुळे तुला यातना होणे अगदीच स्वाभाविक. पण, मूळ विषय संतोष देशमुख यांच्या हत्येचा असेल तर त्याविषयी बोलायचे की नाही? संतोषच्या पत्नी-मुलीचे अश्रू आपल्याला दिसणार की नाही? सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आक्रोश आपल्याला ऐकू येणार की नाही? असे सगळे घडत असताना आपण गप्प राहातो अथवा असे जे घडवतात, त्यांना बळ देतो किंवा ‘कॉम्प्रोमाइज’ करतो, म्हणून अशी वेळ येऊन ठेपते.


प्राजक्ता, तुला ज्या प्रवृत्तींची चिंता वाटते, त्या प्रवृत्ती हे अशा राजकारणाचे अपत्य आहे. या प्रकारच्या राजकारणातून आकाराला येणारा समाज सगळ्यात पहिल्यांदा महिलांवर हल्ला चढवत असतो. माझी एक कविता आहे. कवी म्हणून मी तुझ्याच वर्गात आहे बरं का! ‘मसाप’ मला पुरस्कार देत नाही, हा भाग वेगळा. तुला हसू येईल, हे वाचताना. तुझं हसणं मला भारी आवडतं. चर्चा भरकटवण्याचा हा काळय. मीही भरकटलो. हो, तर मुद्द्यावर येतो. माझ्या कवितेतल्या या ओळी…

“कोणतंही तालिबान 

पहिला हल्ला करतं बुद्धावर

आणि, 

बाईला बुरख्यात बांधून 

निघतं पुढच्या युद्धावर!” 

प्राजक्ता, हे तालिबान ओळखायला हवं. हा धोका समजायला हवा. 


खरं सांगू, तू आताच बोलणं हे व्यवस्थेच्या सोईचंही असू शकतं. तुझा वापर करण्याचं हे कारस्थान असू शकतं. कोणी सांगावं, विचलनासाठी रचलेलं हे नाट्य तुला ठाऊकही नसावं. पण, ते सोडू क्षणभर. मुद्दा हा आहे की, आपण कोणत्या वाटेवर आहोत, हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. 


मला सांग प्राजक्ता, नवीन संसद भवनाच्या उदघाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित नसतात, तरी आपण चूप बसतो. बिल्किस बानोवर जे बलात्कार करतात, त्या आरोपींचे जाहीर सत्कार होतात, तेव्हा आपण गप्प असतो. साक्षी मलिकला कुस्ती सोडावी लागते, याचे आपल्याला काही वाटत नाही. विनेश फोगाटवर अत्याचार होत असतानाही आपल्याला बोलण्याची इच्छा होत नाही. अगदी त्याहीपूर्वी सोनिया गांधींना थेट ‘बारबाला’ म्हटले जात असताना आणि नंतर महुआ मोइत्राचा छळ होत असताना कोणीच बोलत नाही. मग, त्याच रांगेत आज तू आल्यावर तू वगळता कोणाला कशाला वाईट वाटेल, प्राजक्ता? 


प्राजक्ता, तुझी पत्रकार परिषद हा ‘परफॉर्मन्स’ असेल तर तो बेस्टच होता! पण, तुझ्या आईचे अश्रू खोटे नव्हते. खरं तर तूही मला खोटी नाहीस वाटली. विचार करणारी, समंजस, प्रगल्भ आणि कर्तबगार मुलगी वाटलीस मला. स्वतःवरच्या अन्यायाने तू दुखावलीस. अस्वस्थ झालीस. मलाही वाईट वाटलं. पण, संवेदनशीलतेचा हा परिघ जरा वाढवायला हवा. अस्वस्थ करणारा हा जो भवताल आहे, त्यालाच जाब विचारायला हवा. 


तुझ्यासह महाराष्ट्रातल्या अवघ्या महिलांनी निखळ हास्यजत्रेत सहभागी व्हावं, अशी तुझी इच्छा असेल, तर तेवढं करायला हवं. 

तुझ्या उत्तराची वाट पाहातोय. 


- संजय आवटे