मुंबई : शालेय शिक्षणात पहिली ते आठवी इयत्तांच्या परीक्षा घेतल्या तरी सगळ्याच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बढती देण्याच्या धोरणात बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या निर्णयानुसार, आता पाचवी व आठवी इयत्तांतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुनर्परीक्षेचा पर्याय असेल. मात्र पुनर्परीक्षेतही गुणपत्रिकेत लाल शेरा आल्यास संबंधित अनुत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनीला वर्षभर त्याच वर्गात बसावे लागेल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली असून, इयता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी केले. त्यानुसार, पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. आतापर्यंत, या प्रकारच्या आव्हानाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत नव्हते.
शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थी पाचवीची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्याला पाचवीच्याच वर्गात बसावे लागेल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाचवी आणि आठवीसाठीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे.
-------------------------------

