ब्रम्हा, विष्णू , महेश या तिन्ही देवांनी स्वतःचे आत्मदान केले. आत्मदाना सारखे मोठे दान नाही ; दुसऱ्याचेही चांगले व्हावे या भावनेतून परमाब्धिविचार दुसऱ्यांना सांगावे - परमात्मराज महाराज

Kolhapur news
By -

 

          




                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      ब्रम्हा, विष्णू , महेश या तिन्ही देवांनी स्वतःचे आत्मदान केले. आत्मदाना सारखे मोठे दान नाही.  तिन्ही देवामध्ये भेद नाही. ज्यांच्याकडे अभेद भाव आहे तोच दतगुरूंना जाणू शकतो. निरिच्छ भावनेने भक्ती करावी. दुसऱ्याचेही चांगले व्हावे या भावनेतून परमाब्धिविचार दुसऱ्यांना सांगावे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते संजीवनीगिरीवर दत्तजन्म सोहळ्यातील प्रवचनात बोलत होते.

      


      दिगंबरा... !  दिगंबरा...! च्या जयघोषात आडी (ता.निपाणी) येथील संजीवनगिरी वरील दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रतिकात्मक श्रीदत्तगुरूंना पाळण्यात ठेवून गुलाल फुले यांची उधळण करण्यात आली. "श्री गुरुदेव दत्त..." असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला. यावेळी फटाके वाजवून आनंद  व्यक्त करण्यात आला. यावेळी भाविकांनी गुलाल फुलांची उधळण केली. यावेळी चांदीच्या पाळण्याला फुलांनी सजविण्यात आले होते. उत्सव मंडप  रंगीत फुगे, फुले फुलमाळांनी सजविण्यात आले होते. सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी पाळणा गायन - सौ. तेजस्विनी सुतार गोरंबे , भारती मोरे व सहकारी यांनी केले.

     

   यावेळी डोंगर पायथ्याशी सर्वेज्य सांस्कृतिक भवनाजवळ स्क्रीन बसवून डोंगरावर मंदिराच्या आवारात होत असलेल्या दत्त जयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खाली असणाऱ्या भाविकांना पाहायला मिळाल्याने आनंद व्यक्त होत होता. डोंगर पायथ्याशी असलेल्या लाखो भाविकांनीही दिगंबरा...! दिगंबरा...!श्रीपाद वल्लभ दिगंबरा...! असा नाम जप आणि श्री गुरुदेव दत्त चा एकच घोष सुद्धा केला. जन्मोत्सव सोहळ्यानंतर परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनाची व्यवस्था डोंगर पायथ्यालाच करण्यात आली होती. भाविक मोठ्या श्रद्धेने भक्तीने रांगेत राहून प.पू. परमात्माराज महाराजांचे दर्शन घेत होते. वल्भालयाच्या समोर प्रशस्त अशा जागेत महाप्रसाद वितरण करण्यात आले. स्त्री पुरुष, आबालवृद्ध अशा लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळपासूनच मंदिरामध्ये श्री गुरुदत्तात्रेयांच्या दर्शनासाठी व सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.  

   

     धोंडीराम महाराज दऱ्याचे वडगांव यांनी दत्तजन्म आख्यानावर आधारित किर्तन सादर केले. 6 डिसेंबर पासून सुरू असलेल्या परमाब्धिविचार महोत्सवात सद्गुरू परमात्मराज महाराजांचे परमाब्धी ग्रंथाविषयीचे विस्तृत विवेचन भाविकांना ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली. प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही विविध संप्रदायाचे साधुसंत, राजकारणातील सर्वपक्षीय नेत्यांनी महोत्सव काळात भेट देऊन पारमार्थिक लाभ घेतला.  तसेच भाविकांमध्ये विविध जाती, धर्म, पंथाचे लोकांनी उपस्थित राहून परमाब्धि विचार सोहळ्याचा परमानंद घेतला. खऱ्या अर्थाने वैश्विक विचारांचा महोत्सव मोठ्या आनंदात संपन्न झाला. 

    

   यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, दत्तगुरुनी यदुराजा ला सांगितले की, जगात अनेक बाबी आहेत त्यापासून उपदेश घेता येतो. मुंग्यांना खाद्य पदार्थ मिळाले तर अन्य मुंग्यांना विशिष्ट हार्मोन रूप फेरोमोन द्वारे संदेश पोहचवितात. तसेच एखाद्या धोक्याची सुचना सुद्धा विशिष्ट हार्मोनरूप अलार्म फेरोमोनद्वारे संदेश देत असतात. त्याप्रमाणे माणसाने परमाब्धिविचार दुसऱ्यापर्यंत पोहचवावे. परमाब्धि विचार भवसागरातून तरुन जाण्यासाठी उपयुक्त आहे. अज्ञान निद्रेतून जागृत होण्यासाठी परमाब्धिविचार वेळोवेळी अलार्म प्रमाणे संकेत देत राहतात. चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करीत पुढे पुढे जाऊया. परमाब्धिविचार भाविक जनतेला भवसागरात बुडू देणार नाहीत, असे सांगितले.

‌       

       श्रीदत्त जन्मसोहळ्याच्या वेळी श्री देवीदास महाराज, विरागीदास महाराज नांदेड,   विष्णू चैतन्यजी महाराज उत्तराखंड, काका महाराज विटेकर आदी साधुसंत तसेच पंकज पाटील, प्रसन्नकुमार गुजर, अमित पाटील,  महादेव वाळके, सदाशिव वाळके अकिवाट, भगवान मगदूम हैद्राबाद, विठ्ठल मगदूम, अप्पी पाटील, सचीन शेटे सांगली, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री अमोल महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्रीधर महाराज, मारुती महाराज व आश्रमस्थ विद्यार्थी व वीणावादक उपस्थित होते.




      -----------------------------------------