मंगळवेढा : EVM विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते. ज्या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा मारकडवाडी गावात पोहोचणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी राज्यभर चर्चेत आले आहे. कारण या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील केले होते. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे ग्रामस्थांना बॅलेट पेपरवरील इच्छा मतदान घेता आले नव्हते. या गावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. मारकडवाडी या ठिकाणी होणारी मतदान प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. तसेच या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले होते. त्यामुळे बॅलेट पेपरवर होणारी मतदानाची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करुन भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
--------------------------

