गुरू एक तूही माझा. विधाता अचल. गुरुविना सुने सारे विश्व हे सकल .

Kolhapur news
By -

 

          


              कोल्हापूर न्यूज  /  वि.रा .भोसले


     प्रकाशराव आबिटकर कॅबिनेट मंत्री झाले. उपमुख्य मंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी  शब्द पाळला.स्व. सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनीही प्रकाशरावांच्या करता निर्वाणीचा शब्द टाकला होता. या दोघांचेही राजकीय गुरू स्व.सदाशिवराव मंडलिक साहेब हे होत.

     स्व.मंडलिकसो यांनी कधीच कोणाकडे लाचारी केली नव्हती.शरद पवार यांचा बोलबाला असतांना सुध्दा त्यांनी स्वतःचे स्वतंत्र असे वजन विधानसभेत ठेवले होते.


      मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे  दिग्गज नेते देव पाण्यात घालून बसले होते तेंव्हा स्व.मंडलिक सो यांनी चक्क यशवंतराव मोहिते यांना पाठिंबा दिला होता.


    कडेची खुर्ची धरून बसणाऱ्याला राजकारणात एवढी किंमत नसते.दुसऱ्यांच्या आवाजात आवाज मिसळून उगीचच झिंदाबाद म्हणत मागून फिरणाऱ्याला सुध्दा  किंमत नसते. 


    'काय व्हईल ते होऊ दे '


 म्हणून स्वतःला झोकून देणाऱ्याला राजकारणात वेगळं वजन असते हे स्व.सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वातून दाखवून दिले होते.


     यशवंतराव मोहिते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत .तरीही विधान भवनात एका दाढीवाल्या आमदाराला जबरदस्त महत्व प्राप्त झाले होते.

   ते दाढीवाले होते स्व.सदाशिवराव मांडलिक.


    बाहेर मंडलिक साहेब आले आहेत असे कोणी सांगत आले तर पश्चिम महाराष्ट्रातील  आमदार जेवणाच्या ताटावरून उठून यायचे.त्यांचे खरकटे हात पाहून साहेब म्हणायचे ,


"आधी जेऊन घ्या.मुद्द्याच बोलायचं आहे तेंव्हा पोटभरून जेऊन घ्या."


    शरद पवार सुध्दा त्यांना वचकून असायचे.

   त्यानंतर जवळ जवळ ३८ वर्षांनी म्हणजे २०२२ साली  एकनाथ शिंदेच्या रूपाने आणखी एक स्वाभिमानी दाढीवाला महाराष्ट्राच्या विधानसभेने पहिला.

   लहानपणी स्व. मंडलिक साहेबांना झरोक्यातून पाहणाऱ्या संजयदादा आणि प्रकाशरावांना हा नवा दाढीवाला फार भावला.त्यांना शिंदेंच्या व्यक्तिमत्वात मंडलिक साहेबच दिसले असावेत.


  'काय व्हईल ते होऊदे'

 

     म्हणून  या दोघांनी एकनाथ शिंदेंच्या बंडात उडी घेतली.

      संजयदादा खासदारकीची निवडणूक हरले. बेसावध क्षणी व्होट जिहादच्या लाटेत अनेक मोठे नेते गुदमरून गेले.


   याचा फायदा घेत विधानसभेत महाविकास आघाडीने जबरदस्त आव्हान उभे केले होते. उध्दव ठाकरे तर मुख्यमंत्री पदासाठी दिल्ली वारी करून आले.

शरद पवारनी त्यांची डाळ कांहीं शिजू दिली नाही.पत्रकार परिषदेला सामोरे जातांना मधली जागा शरद पवारांकडे कधि गेली हे उध्दवना समजलेही नाही.कडेला बसून उद्वव आशाळभूतपणे सत्तेचा सारीपाट पहात होते.


    प्रकाशराव हे सगळं पहात होते.आदमापुरात के . पी पाटील यांच्या प्रचारासाठी उ.बा.ठा.ची  प्रचंड सभा पार पडली.अनेकांनी छातीवर हात ठेवले.प्रकाशरावांना मात्र आपले काम आणि दोन दाढीवाले समोर दिसत होते.एक राजकीय गुरू आणि दुसरा राजकीय नेता.


    'काय व्हईल ते होऊ दे '


 म्हणून त्यांनी धनुष्यबाण ताणला आणि निशाणा बरोबर लागला.

   गुरू श्रध्देची ताकद ही अशी असते.

    ना.प्रकाशराव आबिटकर कोल्हापुरात आल्या नंतर न चुकता स्व.मंडलिक साहेबांच्या प्रतीमेसमोर  नतमस्तक झाले. गुरूबंधु संजय दादांनी त्यांना हार घातला तेंव्हा लहानपणी झरोक्यातून पाहिलेले स्व.मंडलिक साहेब त्या दोघांनाही आठवले.डोळ्यांच्या कडातून टपकलेले थेंब  बहुदा त्याचीच साक्ष देत होते.

'  गुरू एक तूही माझा विधाता अचल .गुरुविणा सुने सारे विश्व हे सकल.'

  

     या  ओळी कोणाच्या तरी मोबाईल वर ऐकू येत होत्या.




         -----------------------------------