गॅरंटेड निवृत्ती वेतन योजना एक एप्रिलपासून लागू : ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली होती मंजुरी

Kolhapur news
By -

 

             


      नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (एनपीएस) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना (यूपीएस) ची अधिसूचना शनिवारी जारी केली. एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या योजनेत एनपीएसचा पर्यायही देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यूपीएसचा पर्याय द्यावा लागणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी यामध्ये देण्यात आली आहे.


   केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी २४ ऑगस्ट रोजी त्याला मंजुरी दिली होती. यूपीएसमध्ये १० हजार रुपयांच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी आहे. यूपीएसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाईल. कर्मचारी आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील १०-१० टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करतील. संयुक्त निधीत ८.५% अतिरिक्त रक्कम केंद्र सरकार जमा करणार आहे. व्यक्तिगत निधीत गुंतवणुकीचा पर्याय ज्यांनी निवडलेला नाही त्या कर्मचाऱ्यांसाठी 'डिफॉल्ट गुंतवणूक पॅटर्न'ची एनपीएस योजना लागू असेल. विद्यमान कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने एनपीएससंदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या चिंता मिटवण्याच्या दृष्टीने यूपीएसचा पर्याय सुचवला होता.


        ----------------------------