आत्महत्ये पूर्वीची चिट्ठी पुरावा होऊ शकत नाही : नागपूर उच्च न्यायालय

Kolhapur news
By -

         


     नागपूर  : उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात नमूद केले की, केवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे कोणावर गुन्हा सिद्ध करता येणार नाही. न्या. उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.


प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, अमरावतीच्या दर्यापूर येथील एका तरुणाचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील तरुणीशी नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बीसीए पदवीधर असलेल्या तरुणाने लग्नाचे वचन देऊन तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्याचे दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याच्या संशयाने व्यथित झालेल्या तरुणीने ३ डिसेंबर २०२० रोजी चिठ्ठी लिहून गळफास घेतला.


न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, घटनेच्या चार महिने आधीच दोघांमधील नाते संपुष्टात आले होते. व्हॉट्सअॅप चॅटवरून दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने झाल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी तरुणीने तरुणाची  माफीही मागितली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, नाते तुटल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाली हे गृहीत धरता येणार नाही. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्येचे कृत्य यांच्यात थेट संबंध असणे आवश्यक आहे.


खामगाव सत्र न्यायालयाने आरोपी तरुणाला दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपीतर्फे अॅड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने निष्कर्ष काढला की, जप्त केलेले साहित्य गुन्हा सिद्ध करण्यास अपुरे आहे आणि हा खटला चालवणे केवळ औपचारिकता ठरेल.


              ------------------------