बेचाळीसच्या क्रांतीचे पडघम ऐकत मुरगूड चे डी आय जी मोठे झाले.

Kolhapur news
By -

 

            



                कोल्हापूर न्यूज  /  वि. रा. भोसले


     डी आय जी म्हंटले की पोलिस खात्यातील मोठा अधिकारी डोळ्यासमोर उभा रहातो.मुरगूड मध्ये असे एक डी आय जी होऊन गेले.तोच आवाज ,तोच दरारा,कामातील तीच तळमळ ,एक लोक लाडका कार्यकर्ता.

     पोलिस पदवी नसलेला पण लोकांना डी आय जी वाटणारा हा मनस्वी समाज सेवी कार्यकर्ता म्हणजे मुरगूड चे धनाजी ईश्वरा गोधडे.

     होय तेच ते ईश्वरा गोधडे धनाजींचे वडील की ज्यांनी गारगोटी येथे ४२च्या कचेरीवरील हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम भारमल या हुतात्म्यास कचेरी पासून इंजूबई मंदिरा पर्यंत पाठीवरून आणले.तिकडे  काचेरीतला कांबळे पोलिस फुटलेल्या काचेच्या खिडकीच्या छिद्रातून क्रांतिकारकांच्या वर गोळ्या झाडत होता.ईश्वरा गोधडे एक धिप्पाड मल्लच होते . त्यांचे पित्त खवळले होते .

त्या कांबळे पोलिसाला आता मी संपवणारच.  पाठीवरचे तुकाराम भारमल शेवटचा श्वास घेत होते.ते जीर्ण आवाजात म्हणाले.


   "ईश्वरा त्येला मारू नकोस ,त्यो आपलाच देशबंधू हाय पण हुकुमाचा गुलाम हाय.आपला शत्रू इंग्रज हाय हे लक्षात ठेव."


     एवढे बोलून तुकाराम यांनी प्राण सोडले.आपला सहकारी गेला म्हणून इस्वरा गोधडे यांनी आक्रोश केला.वाघ्या बो ळाचा मठ म्हणजे क्रांतिकारकांची हल्ला चौकी .तेथे सगळे जमायचे.

    सातजण शहीद झाले.ईश्वरा गोधडे या अजरामर क्रांतीचे साक्षीदार होते. भूमिगत क्रांतिकारकांना ते नेहमी झुणका भाकरी पुरवायचे.त्यांची पत्नी सुध्दा यात मदत करत असे.देशभक्त रत्नाप्पा कुंभार हे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी होते.

 वडीलांच्या कुशीत क्रांतिकारकांच्या या आणि अशाच  चित्तथरारक कथा ऐकत धनाजी उर्फ डी आय जी मोठे झाले. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर माजी आमदार संजय घाटगे यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. त्यांच्या अन्नपूर्णा शुगरचे ते संचालक बनले.संजय घाटगे यांच्या बरोबरचे मैत्र त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळले.

     मुरगूड नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष म्हणून सुध्दा त्यांनी चोख कामगिरी केली. मुरगूड च्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी तंत्रशुद्ध आणि परखड विचार मांडले.आपण जे पाणी पितो ते सर्व गटारांनी प्रदूषित केलेले आहे.येवढेच नव्हे तर कांहीं बेजबाबदार लोकांनी सुध्दा जनावरे,कपडे , वहाने धुवून प्रदूषित केले आहे.ते पाणी केवळ शेतीसाठी असते तर या गोष्टींचा विचार करायचे कारण नव्हते.पण नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे.

     लढावू वृती ठेवत ते इतरांनाही सांभाळून घ्यायचे .संचालक मंडळ आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांचे वर एक प्रकारची त्यांची जरब असायची .म्हणूनच त्यांच्या नावाला त्यांनी डी आय जी ही आपुलकीची बिरुदावली लावली.

     डी आय जी आपल्यात नाहीत.त्यांचा ठसा मात्र जनमानसावर उमटून राहिला आहे.त्यांचे  बंधू बाजीराव गोधडे यांनी ही बिद्रीच्या साखर कारखान्याचे संचालक पद भुषविले आहे.

    या क्रांतिकारक घराण्याने कृषी संशोधनात,दुग्ध व्यवसायात सुध्दा क्रांतिकारक प्रगति केली आहे.रासायनिक खतांचा वापर करून पीक उत्पादन करणे म्हणजे शरीरात विष पसरविण्याचे आहे असे परखड विचार सर्व बंधूंनी  मांडले .आमच्यातला 'अर्जुन' विश्रांतीसाठी गेला आहे असे भावपूर्ण उद्गार त्यांनी डी आय जी बद्दल काढले.

   हे सांगताना त्यांचे डोळे सुध्दा पाणावले होते.

  ईश्वरा गोधडे नावाच्या एका साहसी देशभक्तांच्या रक्ताचा प्रवाह त्यांच्यात पहायला मिळाला.

    डी आय जी हे याच  क्रांती दुताचे वारस होते .त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.


                   ------------------------