मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून बीड जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. असा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे. खरं तर आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी धनंजय मुंडेंच्या सल्ल्यानुसारच नियुक्त केली जायची. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने हा मंत्री धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडला काही दिवसांपूर्वी सीआयडीने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाल्मिक कराडच्या सुटकेचे मार्ग काही काळासाठी बंद झाले आहेत.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून यासाठी दबाव टाकला जात असल्याची देखील मोठी चर्चा आहे.
------------------------

