कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी १८८ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिप’ देऊन गौरविण्यात आले.
हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सौ.शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, विश्वस्त वैजयंती संजय पाटील, स्कॉलरशिप समिती अध्यक्ष ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुराज पाटील यांनी केले. ऋतुराज पाटील म्हणाले, नातवंडांच्या आयुष्यात आजीचे एक वेगळं स्थान असते. दादा आणि आईसाहेबांना आम्ही नेहमीच दैवत मानतो. दादा सांगतात की माणसात देव बघायला शिका. आम्ही त्यांच्यातच देव पाहिला. शिक्षणाचं महत्व फारसं नसलेल्या काळात आईसाहेबांनी त्यांच्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी आग्रह धरला. राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय दादांनी घेतला आणि त्याला खंबीर असं पाठबळ आईसाहेबांनी दिलं. वात्सल्याच्या धाग्यातून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवलं. हे आमचं घरातील विद्यापीठच आहे. म्हणूनच शिक्षणाविषयी आस्था असलेल्या त्यांच्या दूरद्ष्टीचा विचार करूनच आम्ही ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
---------------------------------

