नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना आहे. या निर्णयानुसार, महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांना जुन्या मालकाचे थकित वीज बिल नवीन मालकाकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरणने थकबाकीदार ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे, जी ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत व्याज आणि दंड माफ करून थकबाकी भरण्याची संधी देण्यात आली आहे.
महावितरणने नागरिकांना सूचित केले आहे की जुनी जागा किंवा घर खरेदी करताना वीज बिलाची थकबाकी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण नवीन मालकी हक्कासोबत जुन्या थकबाकीचे उत्तरदायित्वही नवीन मालकाकडे येते. थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीज जोडणी दिली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रासह विविध राज्यांतून अशी १९ प्रकरणे दाखल झाली होती, ज्यावर न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
-------------------------

