दहावी बारावीच्या परीक्षा गरजेच्या असल्या तरीही या परीक्षा पूर्वीसारख्या जीवनातील महत्त्वाच्या परीक्षा राहिल्या नाहीत. निकालही ९० टक्क्यांच्या पुढे लागतो. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रवेश परीक्षेद्वारेच प्रवेश दिले जातात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये. आहार योग्य घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये नकार, अपयश पचविण्याचीही क्षमता हवी. त्यातूनच जीवनात यशस्वी होण्याची जिद्द निर्माण होत असल्याचे मत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले , अन् स्वअध्ययनानेच परीक्षा द्यावी. त्यातून उन्नती होत असल्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.
प्रश्न : कॉपीमुक्तची अंमलबजावणी केवळ सीसीटीव्हीद्वारेच करणार का ? अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीही नाहीत
उत्तर: असे नाही. केंद्र संचालकांसह सुपरवायझर, बिल्डिंग कंडक्टर, शिपाईं सर्व स्वतःच्या केंद्राऐवजी दुसऱ्या केंद्रावर असतील. संबंधित केंद्रावरील हे कर्मचारी तिसऱ्या ठिकाणी जातील. तर तिसऱ्या ठिकाणचे कर्मचारी-अधिकारी हे इतरत्र जातील. यातून स्वतःचे विद्यार्थी पास करण्याची स्पर्धा अन त्यातून होणाऱ्या कॉपीवर पूर्णपणे आळा बसेल. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातही त्याचा समावेश करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
प्रश्न : प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक आहेत का? सर्वत्र उपलब्धतेची फेरतपासणी केली आहे का ?
उत्तर : सीसीटीव्ही बंधनकारक केलेले नाहीत. केवळ सीसीटीव्ही जिथे आहे तिथे सुरू करावे. इतर सर्वांनी ते सुरू ठेवावे असे आवाहन केले. कारण अनेक शाळा या खासगी संस्थांच्या आहेत. संस्थांची आर्थिक परिस्थिती नसते.
प्रश्न : इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत यंदा विद्यार्थी हिताची कुठली योजना आहे का ?
उत्तरः हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी आपण कॉपीमुक्त अभियान राबवत आहोत. त्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जनजागृती सप्ताह सुरू करणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचीही जनजागृती करणार आहोत. विद्यार्थ्यांनी योग्यरित्या अभ्यास करावा. हेच मी सांगू इच्छितो.
प्रश्न: डिप्रेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांव्यतिरिक्त इतरही उपक्रम राबविणार का ?
उत्तर : यात कौन्सिलिंग हा मुख्य घटक आहे. तो करतोच. शिवाय कॉपीमुक्त सप्ताहामार्फत ताण-तणाव मुक्त उपक्रमांचेही विविध सत्र घेणार आहोत. परीक्षेच्या काळात कौन्सिलिंग तज्ज्ञांमार्फत, डॉक्टर किंवा प्रसंगी मोटिव्हेशनल स्पीकर,शिक्षकामार्फतही करणार आहोत.
प्रश्न: जेईईची परीक्षा अन् बोर्डाची प्रात्याक्षिक परीक्षा, संभ्रम कसा दूर करणार ?
उत्तर: याच कालावधीत सीबीएससीचेही पेपर असतात. त्यामुळे जेईई मेन असेल त्या विद्याथ्यांची प्रात्याक्षिके शाळेने योग्य वेळेत अॅडजेस्ट करावे. असे लेखी आदेश दिले. जसे की प्रात्याक्षिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. पण १६ व्या दिवशीही घेतले तर त्याला कुठलीही हरकत नाही. सर्वांशी मिळून चर्चा करुनच हा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या.४० हरकती आल्या. त्यावर आम्ही समर्पक उत्तरहे दिलीत. दुसऱ्या बाजूने आउट ऑफ टर्न म्हणूनही एक पर्याय विद्यार्थ्यांना असतो. पण त्याचे शुल्क जास्त असते. परंतु जर एकाच ठिकाणी जास्त विद्यार्थी प्रात्याक्षिके देण्याचे बाकी असतील. तर प्रसंगी हे शुल्कही कमी किंवा माफही करता येतील.
------------------------------------------------

