देहू :प्रसिद्ध शिवव्याख्याते ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज होते.
संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे.
शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळा सुध्दा झाला होता. "ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा," असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत होते. 'लव्ह जिहाद', 'उद्योग जिहाद', 'लॅण्ड जिहाद', 'फूड जिहाद', धर्मांतरण या सारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते.
शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले? याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दडलं आहे.पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे. या चिठ्ठ्यांमधून आत्महत्येमागचं कारण ही समोर आलं आहे. माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना ही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, पैकी कार विकून 7 लाख फिटतील.
वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या,अशी विनंती शिरीष महाराज मोरेंनी मित्रांना केली आहे. मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली आहे. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग. असं ही चिठ्ठीत नमूद केलेलं आहे.
शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.
-----------------------------------------

