कॅन्सर सोबतचा लढा ! : वर्ल्ड कॅन्सर डे.. निमित्त टीव्ही अँकर ज्ञानदा कदम यांनी स्वतःच्या वडिलांच्या बाबतीत सांगितलेला स्वअनुभव कॅन्सर आजाराबाबत जनजागृती करणारा आहे

Kolhapur news
By -

 

             


               ( वर्ल्ड कॅन्सर डे.. निमित्त टीव्ही अँकर ज्ञानदा कदम यांनी स्वतःच्या वडिलांच्या बाबतीत  सांगितलेला स्वअनुभव कॅन्सर आजाराबाबत जनजागृती करणारा आहे ) 



गेल्या वर्षी कॅन्सरचा अगदी जवळून अनुभव आला. माझ्या वडिलांना या आजाराचं निदान झालं. माझे बाबा खरंतर अतिशय उत्तम आणि शिस्तबद्ध लाईफस्टाईल जपाणारे व्यक्ती. आहार आणि व्यायामाच्या बाबातीत कमालीचे पर्टिक्युलर. त्यामुळे त्यांना कॅन्सरचं निदान होणं आम्हा घरच्यांसाठी भयंकर मोठा धक्का होता.

आजही ज्या आजाराबद्दल मनात फक्त आणि फक्त भीती बसलीय तो आजार आपल्या घराचा दरवाजाही ठोठावेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. 


पण हा आजारच असा आजार आहे जो ध्यानी मनी नसताना, तुम्ही बेसावध असताना तुम्हाला गाठतो आणि मग परीक्षा पाहतो. 


गेल्या वर्षी बाबांच्या निमित्ताने कॅन्सरचं आजारपण बरंच काही शिकवून गेलं..त्यातल्या काही कामाच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आज मला वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्तानं शेअर कराव्याशा वाटतायेत. ज्याचा कदाचित काहींना फायदा होऊ शकेल. कारण या आजाराची तांत्रिक माहिती डॉक्टर देतातच. पण या आजाराशी लढताना तांत्रिक माहितीपलीकडच्या गोष्टी अनुभवातूनच शिकता येतात.


 🔹मला काय होतंय? किंवा मला काय धाड भरलीये? ही वाक्यं आणि ही मेंतलिटी आयुष्यातून मायनस करायला हवी. माझे बाबा रेग्युलर मेडिकल फॉलोअप घेत असल्याने त्यांच्या कॅन्सरचं निदान खूप लवकर झालं, ज्याचा पुढच्या ट्रिटमेंमध्ये फायदाच झाला...सोबतच डॉक्टरांनी कॅन्सर असू शकतो या शक्यतेची त्यांची मानसिक तयारीही करुन घेतलेली होती. खरंतर कोणत्याही आजाराच्य़ा आधी आपली बॉडी आपल्याला सिग्नल देत असते, सावध करत असते. शरीरातला किंवा तब्य़ेतीतला छोटासाही बदल दुर्लक्षित ठेवणं कॅन्सरच्या बाबतीत घातक ठरतं. त्यामुळे वेळोवेळी मेडिकल चेकअप इज मस्ट.


 🔹कॅन्सरचं आजारपण अतिशय खर्चिक आहे. या आजाराशी लढताना तुमची आजवरची जमापुंजी वाऱ्याच्या वेगाने संपू शकते. त्यामुळे सगळ्यात आधी मेडिक्लेम बद्दल सिरीयस बना. तुमच्या कंपनी कडून जरी तुम्ही स्वतः आणि तुमचं कुटुंब एन्शुअर्ड असाल तरी घरातल्या प्रत्येकाचा एक स्वतंत्र खाजगी मेडिक्लेम असायला हवा. तो नसेल तर लवकरात लवकर काढा.

सुदैवानं माझ्या आईवडिलांनी दूरदृष्टीने विचार करत स्वतंत्र खाजगी मेडिक्लेम काढला होता. त्याचा अर्थातच खूप मोठा फायदा झाला.. माझ्या वडिलांच्या आजारपणात आर्थिक ताण जरुर आला पण मेडिक्लेम मुळे त्याचा बराचसा भार कमी झाला.. त्यामुळे आजच्या जमान्यात चांगल्या आणि मोठ्या रकमेच्या मेडिक्लेममधली इन्व्हेस्टमेंट केव्हाही फायद्याचीच आहे हे या आजाराने नव्यानं शिकवलं.


 🔹खरंतर ध्यानी मनी नसताना बाबांना कॅन्सरचं निदान झालं. मी ज्या दिवशी एबीपी माझा सोडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हातात त्यांचा रिपोर्ट होता पण तो स्वीकारायची मनस्थिती नव्हती.. तुम्हाला कॅन्सर झालाय हे पप्पांना सांगण्याची जबबादारी माझ्यावर आली होती. कितीही मन खंबीर केलं तरी ती काही सोप्पी गोष्ट नव्हती. त्यांच्या कॅन्सरचं निदान ते ऑपरेशन हे दिवस माझ्यासाठी खऱ्याअर्थानं इमोशनल स्ट्रगलचे होते.

आठवड्याभरात करिअरची नवी सुरुवात करायची आहे आणि त्याच वेळी वडिलांना कॅन्सरची ट्रीटमेंट द्यायची आहे. सावरायला आणि सांभाळायला खरंतर वेळच नव्हता. त्याकाळात गोष्टी अक्षरशः मेकॅनिकली घडत होत्या. मनस्थिती कुणाचीच चांगली नव्हती पण एकमेकांना सावरण्यासाठी प्रत्य़ेकजण आपण किती खंबीर आहोत हेच दाखवत होता. 


🔹मी, आई आणि पप्पा तिघांनी पटापट निर्णय घेतले आणि पुढची ट्रीटमेंट सुरु केली. अर्थात कुटुंबातल्या सर्वांची यात सकारात्मक साथ मिळाली. कॅन्सरचं निदान होणं आणि उपचार सुरू होणं यात आयुष्याची एकप्रकारे बाजी लागलेली असते. त्यामुळे कोणत्याही पातळीवर विलंब करणं म्हणजे आजारी व्यक्तीच्या जीवाशी खेळणं. बऱ्याचदा या आजाराचे निदान झालं की हातात रिपोर्ट असूनही दिल है की मानता नाही, अशी काहीशी अवस्था होते. पण या आजाराने आपल्याला गाठलं आहे हे जितकं लवकरात लवकर स्वीकराल तितकं बरं होण्याच्या दिशेनं तुम्ही पहिलं पाऊल टाकाल..


🔹कॅन्सर सारख्या आजारात आयुष्याची स्पर्धा ही वेळेशी असते. काही तासांचा, काही दिवसांचा विलंब जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सेकंड, थर्ड, फोर्थ ओपिनियन ची प्रोसेस जास्त लांबवू नका. आम्हाला सुदैवानं पहिल्या टप्प्यापासून उत्तम डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळालं. 

डॉ. संजय ओक सरांनी तातडीने  डॉ. अनुप रमाणी सरांकडे पाठवलं...ओक सर असोत किंवा रमाणी सर या दोघांची वैद्यकीय क्षेत्रातली एक्सपर्टी इतकी मोठी आहे की आम्ही सेंकड आणि थर्ड ओपिनिअनच्या भानगडीत न पडण्याचा निर्णय घेतला. कारण जितका वेळ जास्त जाणार तितके उपचार लांबणार. त्यामुळे अशा आजारात योग्य आणि लवकर निर्णय घेण्यावर भर द्या.


🔹कॅन्सर च्या ऑपरेशन आधी कराव्या लागणाऱ्या टेस्ट प्रचंड वेळखाऊ, खर्चिक आणि पेशंटला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकवणाऱ्या असतात. पप्पांची PET-SCAN टेस्ट तर तीन तास लांबली. बाकीच्या BLOOD TEST, MRI, BIOPSY यांची कहाणी वेगळीच. पप्पांनी हे सगळं धाडसाने आणि संयमाने निभावलं. या सगळ्या टेस्ट च्या वेळी पेशंट ला खचू न देणं याची जबाबदारी कुटुंबाचीच असते. ती उत्तमपणे पार पाडा. त्या टेस्टचे रिपोर्ट काय येतील याचं अतिरिक्त टेन्शन घेऊ नका आणि देऊही नका..सतत त्या आजाराबाबात चर्चा करणं टाळा.


 🔹अरे बाप रे कॅन्सर झाला आहे, आता यांचं कसं होणार? हा प्रश्न नकारात्मक पद्धतीने विचारणाऱ्या आणि तुमच्या काळजीत भर टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यातून काही काळासाठी दूर सारा. सुदैवानं आमच्या घरातील प्रत्य़ेकानं YES WE CAN म्हणत पप्पांना या आजारातून बाहेर पडायला साथ दिलीये. महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाबांनीच या सगळ्या प्रोसेसमध्य़े इतकं फायटिंग स्पीरीट दाखवलं की डॉक्टरही अचंबित झाले..त्यामुळे ज्यांना कॅन्सर झाला आहे त्यांच्या आसपास नेहमी शांत, खंबीर आणि पॉझिटिव्ह व्यक्तींचा वावर असूद्या.


 🔹सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर वरचा विश्वास. 

कोणत्याही किंतु आणि परंतु विना उपचारासाठी आपल्या डॉक्टर ला शब्दशः सरेंडर व्हा. त्यांच्या एक्सपर्टी वर शंका घेऊ नका. कारण अस्वस्थ मनाने घेतलेले उपचार योग्य परिणाम साधत नाहीत. कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पेशंटची रिकव्हरी पूर्णपणे इछाशक्तीवर अवलंबून असते. पेशंटची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीही शांतपणे ऐका. त्यांच्या मनाविरोधात जाऊन काहीही करु नका. ते परावलंबी नाहीत याची वेळेवेळी जाणीव करुन द्या. ऑपरेशननंतरची अवघडलेली अवस्था काही दिवसांपुरतीच आहे याचा विश्वास देत रहा.


 🔹नो रडारड आणि नो इमोशनल ब्लॅकमैलिंग.

आपल्या जीवलगांपैकी कुणाला कॅन्सर झालाय हे समजल्यावर पायाखालची जमीन सरकतेच. पण सकारात्मक वातावरण, विचार आणि कृती या आजारातून बरं होण्यासाठी सगळ्यात मोठी मदत करतात. सुदैवानं कॅन्सरच्या या प्रवासात आम्हाला प्रत्येक वाटेवर देवदूतच भेटले. योग्य टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळालं. हे नशिब पदरी टाकणारे डॉ. संजय ओक सर आणि डॉ. अनुप रमाणी सर या दोघांप्रती सदैव कृतज्ञता.


घरची मंडळी तर पावला पावलावर सोबत होतीच पण माझ्या काही मित्रमैत्रिणींचा उल्लेख मला करावासा वाटतो. My four ‘S’ संदीप सर, सचिन, स्नेहा आणि स्नेहल. Thank you so much for everything. या चौघांशिवाय या परिस्थितीतून सावरणं अवघड होतं.

कॅन्सर योग्य उपचार घेऊन बरा होणारा आजार आहे. फक्त त्याला हलक्यात घेऊ नका. तब्येतीच्या बाबतीत हयगय करु नका. हेल्दी रहा आणि आनंदी राहा.


 


©ज्ञानदा कदम

४ फेब्रुवारी २०२५


--------------------------------------------------