लग्नं झाली ,एकसष्टी आली तरी...अजून आम्हीं शाळकरी रे शाळकरी

Kolhapur news
By -

 

         





             कोल्हापूर न्यूज  / वि .रा.भोसले


       "काय गं आम्ही तिघीच ! जेंटस सगळे आलेत.काय करूया ? जायचं त्यांच्या बरोबर ?"


     हा संवाद आहे एकसष्ठीत असलेल्या तीन गृहिणींमधला .

     विद्यामंदिर निपाणी ही एक जुनी प्रथितयश शाळा.या शाळेत पन्नास वर्षापूर्वी एकाच वर्गात शिकत असलेल्या मित्र मैत्रिणींनी सर्वांची एकसष्ठी एकत्र येऊन साजरी करायचे ठरवले.

अभय मानवी व त्यांच्या एक दोन मित्रांनी या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे नियोजन केले.सर्वांना तसे कळवून निमंत्रणे पण पाठवली .एकसष्ठीचा सामुदायिक सोहळा कोकणातल्या एका निसर्गरम्य रिसॉर्ट मध्ये करायचा ठरले होते.

     ठरल्या प्रमाणे सगळे आपल्या त्या जुन्या शाळेजवळ जमा झाले. मुलाबाळांना किंवा कुटुंबातील इतर कुणालाही बरोबर घ्यायचे नाही ही अट होती.

   आकरा जेंटस व तीन लेडीज येवढेच जमले.

 त्या १४ बाल सवंगडी कंपूने शाळेला वंदन केले .जिथे आपण एकत्र खेळलो बागडलो त्या पटांगणातील माती कपाळी लावली , ज्या वर्गात बसलो होतो त्या वर्गात खिडकीतून डोकावलो .गुरुजींची त्यावेळची छडी कोठे कोपऱ्यात दिसते का ते पाहिले .शाळेच्या भिंतींना आलिंगन दिले आणि पाठमोरे होऊन डबडबलेल्या डोळ्यातले अश्रू पुसत आम्ही सगळे सहलीच्या गाडीत बसलो.


       गाडीत बसून पुन्हा एकदा त्या माय ला डोळे भरून पाहिले आणि निघालो. नव्या रुपात ती उभी होती.आणि हात हलवून हसत जणू आम्हाला  टाटा करत  होती असे क्षणभर वाटले.


     अभयजी हे सर्व कंठ भरल्या आवाजात सांगत होते.

 ते अकरा मित्र मैत्रिणी कोकणात निघाले होते.सगळेच एकसष्टीत पोचले होते. सर्वांची  एकसष्ठी एकत्रित साजरी करायची ही भन्नाट कल्पना. 

 आयुष्यातल्या या टप्प्यावर खरं तर घर कसं सगळं भरलेलं असते. पती पत्नी मुलंबाळं आणि नातवंडं सुध्दा घरात एकत्र असतात.

 त्या सगळ्यांना घरीच ठेऊन फक्त त्यावेळच्या शाळकरी सवंगड्यांची काढलेली ही सहल होती.


    दुपारी बारा एक पर्यंत सर्वजण रिसॉर्टवर  पोचले.अगदी निसर्गरम्य ठिकाण होते. झुळझुळणारे झरे,हिरव्या शाली पांघरलेल्या टेकड्या ,उंच आकशाला भिडू पाहणारी नारळी सुपारीची झाडे ,पक्षांचा किलबिलाट ,सगळं कसं रम्य मनमोहक  वातावरण होतं.सर्वत्र झाडीच झाडी.


    " इथे खेळूया का चोर शिपाई ? खुप झाडी आहे लपायला."

    

   आणि खरंच त्या झाडीत त्यांनी चोर शिपायाचा खेळ अर्धा तास खेळला सुध्दा.

 

 खुप भुक लागली होती.रिसॉर्ट वर जाऊन सगळ्यांनी जेवण घेतलं आणि विश्रांती साठी आपापल्या खोल्या गाठल्या.


     सायंकाळी सामुदायिक एकसष्ठी समारंभ अगदी जल्लोषात साजरा झाला.

        

   प्रत्येकाने एकेक आवडते गाणे म्हंटले. कांहींनी त्यावर छान डान्स सुध्दा केला.

 आणि सुरू झाल्या शाळेतल्या त्या गोड आठवणी.

   तिसरीच्या बाई फार कडक होत्या.पाढे पाठ नसले की छड्या द्यायच्या.पुन्हा प्रेमाने जवळ घेऊन संमजवायच्या.

    चौथीच्या गुरुजींनी कान ओढून लांब केले.पाचवीत इंग्रजीच्या सरांनी  लाल शेरे देऊन वही रंगवून टाकली.

    ती सुंदर प्रार्थना आजही पाठ होती.एका ओळीत उभे राहून सर्वांनी म्हंटली .


     त्या मनोहारी आठवणींनी सगळे रोमांचित झाले होते.वारंवार डोळ्यातले अश्रू टीपावे लागायचे.

    

       डायनिंग टेबलवर सुरमई ,पापलेटचा छान बेत होता.सोलकढी खुणावत होती.समारंभाने  मस्त कोकणी साज चढवला होता.


       हे सगळं सुरू असताना सर्व गुरुजींची ,बाईंची आठवण येत होती.त्यांच्या पैकी फारसे कोणी हयात नसावेत.जे हयात होते ते काठी टेकून बागेत फिरताना दिसायचे.

ते  दुर्लभ दर्शन घेण्यासाठी मस्तक आजही झुकायचे.


      हरवलेले ते शाळकरी दिवस पुन्हा मिळणार नव्हते.आठवणी मात्र मागे राहणार होत्या.


    त्या आठवणीच आता निवांत वेळी तुमच्याशी चोर शिपायाचा खेळ खेळणार होत्या.


   ---------------------------------------------