शिक्षण सचिवांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून ५० शिक्षकांना १७ लाखाचा गंडा

Kolhapur news
By -

 

             


           पुणे: पुणे जिल्ह्यात शिक्षण विभागाचे सचिव प्रविण मुंढे यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डॉ. दीपक चांदणे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


प्रकरणाचा तपशील असा की, पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. चांदणे यांनी शिक्षण विभागात आपली ओळख असल्याचे भासवून शिक्षकांकडून १७ लाख रुपये जमा केले. १९ ऑक्टोबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांनी अतिरिक्त सचिव प्रविण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट शासन निर्णय तयार केला.


हा बनावट आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी याची पडताळणी केली. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा आदेश आढळून न आल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने केलेल्या प्राथमिक चौकशीत डॉ. चांदणे यांनी शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळवून देण्याच्या बहाण्याने पैसे गोळा केल्याचे स्पष्ट झाले.


सध्या एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ या प्रकरणाचा तपास करत असून, या प्रकरणात अन्य काही व्यक्तींचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस या दिशेने तपास करत आहेत.


       --------------------------------------------